विधी स्वयंसेवकासाठी अर्ज करण्यास 9 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
जालना/प्रतिनिधी,दि.1
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व त्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या तालुका विधी सेवा समिती अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी येथे विधी स्वयंसेवकांची नेमणूक करणे आहे. त्याकरिता दि. 06/08/2025 पावेतो अर्ज करण्यास मुदत होती. तरी अर्ज करण्याची मुदत दि. 9 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. विधी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी व्यक्ती, विद्यार्थी, आणि महिला उमेदवार अर्ज करु शकतात. असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.
स्वयंसेवक म्हणून निवृत्त शिक्षक, एम.एस.डब्ल्यू विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी / कायद्याचे विद्यार्थी (जोपर्यंत ते वकील म्हणून नावनोंदणी करीत नाहीत तोपर्यंत). बिगर राजकीय सेवाकेंद्रित, बिगर शासकीय स्वयंसेवी संस्था व क्लबचे सदस्य, महिला गट/मैत्री संघ आणि दुर्लक्षित/दुबळ्या गटांसहित इतर स्वयंसहायता गटातील सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीला विधी स्वयंसेवक म्हणून योग्य वाटेल अशी व्यक्ती विधी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस कोणताही पगार, वेतन किंवा मोबदला दिला जाणार नाही फक्त वेळोवेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे ठरवलेले मानधनच मिळेल. या नेमणुकीमुळे कायमस्वरूपी नोकरीला कोणताही हक्क प्राप्त होत नाही तसेच नेमणूक ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात आहे. उपरोक्त गटापैकी पात्र व्यक्ती/विद्यार्थी/महिला यांनी आपला अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व तालुका स्तरावरील तालुका विधी सेवा समिती येथे कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून दि. 9 डिसेंबर 2025 पर्यंत द्यावा. संपर्क जिल्हा न्यायालय परिसर, अंबड चौफुली, जालना दुरध्वनी क्र. ०२४८२-२२३६२५, मोबाईल ८५९१९०३६२१ तालुका स्तरावरील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालय, अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी येथे करता येईल. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


