pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ   अन्…राधाबाई डोंगरे यांनी केले उत्साहात घरीच मतदान…!

घराची केली सुंदर सजावट; प्रशासनाचे मानले आभार

0 1 7 9 3 4

 जालना/प्रतिनिधी,दि.6

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीकरीता 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही. अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्यात येत आहे. आज भोकरदन येथील राधाबाई भाऊराव डोंगरे (वय 90 वर्षे) यांनी त्यांच्या घरीच उभारलेल्या मतदान कक्षामध्ये टपाली मतपत्रिकेवर उत्साहात मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले व प्रशासनाचे आभार मानले.

वयवर्षे 85 वर्षांवरील मतदारांचा मतदाना प्रती असणारा उत्साह बघून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जेष्ठ नागरिक असणाऱ्या या व्यक्ती अतिशय उत्साहात मतदान करीत आहेत. खऱ्या अर्थाने अशा व्यक्ती मतदार आयकॉन आहेत. प्रत्येक मतदाराने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपल्या मताचे महत्त्व लक्षात घेऊन मतदान अवश्य करावे व लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा.

आज  भोकरदन विधानसभा मतदारसंघातील भोकरदन येथील फत्तेपूर रोडवरील शिक्षक कॉलनी मतदान केंद्र क्र. 184 अंतर्गत असणाऱ्या श्रीमती राधाबाई भाऊराव डोंगरे (वय 90 वर्ष) यांनी मोठ्या उत्साहात घरुनच मतदान केले.  निवडणुक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारातंर्गत त्यांच्या घरातच मतदान कक्ष निर्माण करण्यात आला. निवडणूक कर्मचारी भगवान दळवी , महेंद्र साबळे, बीएलओ संदीप शर्मा यांनी मतदान कसे करायचे या संदर्भात यावेळी त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मतदान कक्षाबाहेरील परिसर रांगोळीने सुशोभित करण्यात आला होता. मतदान कक्षात पुष्पहार व फुलांची सुंदर सजावट केली होती. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवास वंदन करत मतदान करण्यात आले. उत्सव भारतीय लोकशाहीचा, लोकशाही समृद्धीचा या फलकाच्या माध्यमातून प्रत्येकाने मतदान करणे किती महत्वपूर्ण आहे, असा मतदान जनजागृतीपर संदेश देण्यात आला. मतदान प्रक्रियेचा यथोचित अवलंब करून गोपनीयरित्या श्रीमती राधाबाई डोंगरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावाला.  घरातूनच मतदान करता आल्यामुळे त्यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

जालना जिल्ह्यात 1 हजार 456 मतदार हे टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणार आहेत. त्यामध्ये 85 वर्षांवरील वय असणारे 1 हजार 189, दिव्यांग 186 तर अत्यावश्यक सेवेतील कार्यरत 81 मतदारांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढावा, कोणताही मतदार मतदानापासून वंचित  राहू नये तसेच सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांना घरुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, दिव्यांग मतदार अशांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करणे शक्य होणार नाही. ज्या मतदारांनी नमुना नं.12 डी अर्ज भरुन दिले असून अशा मतदारांना गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.

वयोवृध्द आणि दिव्यांग मतदारांचे मतदान करुन घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणूक विभागाने फॉर्म 12 डी  मतदारांपर्यंत पोचविला आहे. तरी आता निवडणूक विभागातील कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी गृहभेटी देवून संबंधित मतदारांचे मतदान करुन घेणार असून या प्रक्रियेचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात येणार आहे.

मतदान पथक फॉर्म क्र. 12 डी भरुन दिलेल्या मतदारांकडून मतदान करुन घेण्यासाठी  मतदारांच्या घरी जात आहेत. मतदान पथक हे कधी  घरी येणार आहे याची पूर्व कल्पना अशा मतदारांना व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येत असते. गृह मतदानासाठी असलेल्या मतदान पथकात अधिकारी –कर्मचाऱ्यांचा  समावेश राहणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार गृह मतदानाची प्रक्रिया दि. 12 मे 2024 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती पोस्टल मतदान कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पदमाकर गायकवाड यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे