pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

0 1 7 4 1 4

मुंबई/प्रतिनिधी,दि.8

बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज होती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असून, त्याचा लाभ या शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे, मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असून, यापुढे प्रत्येक वार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने, पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पालकांकडून संमती पत्र, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे