pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सूरज पोर्टलचे दृरदृष्य प्रणालव्दारे लोकार्पण

वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर भर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.13

वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सूरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दृरदृष्य प्रणालव्दारे लोकार्पण करण्यात आले.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, महात्मा फुले महामंडळाच्या व्यवस्थापक श्रीमती सी.ए. वाकोडे यांच्यासह जालना महानगरपालिका व जिल्ह्यातील इतर नगरपरिषद व नगर पंचायतीमधील सफाई कर्मचारी उपस्थित होते.

पीएम-सूरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहायता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. देशातील सफाई कामगारांच्या आरोग्यासाठीही केंद्र सरकार काम करत असून त्यांना आज पीपीई किट वाटप करण्यात येत आहेत. तसेच त्यांना आयुष्मान भारत (आभा) कार्ड देण्यात येत आहे. आभा कार्डच्या माध्यमातून त्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. एससी, एसटी आणि ओबीसी तरुणांसाठी शिष्यवृत्तीत वाढ, वैद्यकीय जागांच्या अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसींसाठी 27 टक्के जागांचे आरक्षण तसेच नीट परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित विषयात पीएचडी करता यावी यासाठी नॅशनल फेलोशिपची रक्कमही वाढवण्यात आली आहे.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नरेश साहेबराव अवचर या उद्योजकाशी संवाद साधला. नरेश हे कृषीतील निरूपयोगी पाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत काम करत आहेत. त्यांनी असिम म्हणजेच डॉ. आंबेडकर सोशल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अर्थसहाय्य मिळवून हा उद्योग सुरू केल्याचे सांगितले. त्यांच्या या उद्योगाने प्रभावित झाल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, कृषी सोबतच पर्यावरणासाठीही चांगले काम करत असल्याबद्दल नरेश यांचे कौतुक केले.

यावेळी देशातील 1 लाख लाभार्थ्यांना पीएम सूरजच्या माध्यमातून 720 कोटी रूपयाचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे