गुरुदेवनगरच्या 78 वर्षीय वृद्धाचा अपघातात मृत्यू:स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार रामभाऊ साबळे यांचा घटनास्थळीच मृत्यू; 20 वर्षीय चालक ताब्यात

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.6
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. गुरुदेवनगर गुरुकुंज येथील ७८ वर्षीय रामभाऊ शेषराव साबळे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.घटना गुरुकुंज मोझरीजवळील आशीर्वाद बार परिसरात दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. रामभाऊ साबळे आपल्या दुचाकीने एम.एच.२७.ए.बी.८८२७ गुरुदेवनगर गुरुकुंजहून तिवसाकडे खाजगी कामानिमित्त जात होते. याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने एम.एच.२७.डी.एल.६२६२ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
तिवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोषी वाहनचालक कलंदर उधीन वय २० वर्षे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. चालकाविरुद्ध कलम २८१, १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनही जप्त करण्यात आले आहे.मृतक रामभाऊ साबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने गुरुदेवनगर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.मोझरी येथे भीषण अपघात: पाईप वाहतूक करणारा ट्रक उलटला; चालक-वाहकाचे हात-पाय मोडले अमरावती ते नागपूर मार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. प्लॅस्टिक पाईप वाहतूक करणारा ट्रक गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत पेट्रोलियमसमोर अनियंत्रित होऊन उलटला. या अपघातात ट्रक चालकाचा पाय आणि वाहकाचा हात मोडला.एमएच-१९ सीवाय ८८३२ क्रमांकाचा ट्रक अमरावतीहून नागपूरकडे जात होता. पहाटे ४ वाजताच्या सुमारास बायपासला जोडलेल्या हायवेवरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकमधील मोठे प्लॅस्टिक पाईप रस्त्यावर विखुरले.जखमी चालक आणि वाहकाला तातडीने अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ट्रक आणि त्यातील पाईपचे मोठे नुकसान झाले आहे. तिवसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. जखमी चालक आणि वाहकाची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.