अवैध वाळूचा ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडून दिला महसूलच्या ताब्यात

शहगड/तनवीर बागवान,दि.25
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर साष्टपिंपळगाव ग्रामस्थांनी पकडला.पोलिस व वाळू माफियांची मिलिभगत असल्याने तहसीलदार यांना फोन करून महसूल पथकाच्या ताब्यात देण्यात आला.या दरम्यान तीन ट्रॅक्टर मात्र पळून गेले असल्याचे साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले.ही घटना आज (बुधवार) पहाटे ४ वाजता घडली असून,९ वाजता महसूल पथकाच्या ताब्यात ट्रॅक्टर देण्यात आला आहे.
गोदावरी नदीपात्रातून रात्री वाळू वाहतूक सुरू आहे.रात्रीच्या या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती.याबाबत दि १३ मे रोजी गोंदीचे सहायक पोलिस निरीक्षक यांना गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल अर्ज ही करण्यात आला होता.मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने साष्टपिंपलळगाव येथील आप्पासाहेब शिंदे,अर्जुन वाघ,दादासाहेब राक्षे,बंटी जाधव,आण्णासाहेब मापारी,क्रांतिकर कट्टे,गणेश जाधव,राजू जाधव,अर्जुन कासुळे आदी ग्रामस्थांनी आक्रमक भूमीका घेत दि २४ मे च्या पहाटे चार वाजता अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेले.
या दरम्यान गोदावरी पात्रात असणारे चार ट्रॅक्टर पैकी तीन ट्रॅक्टर पळून गेले असून एक ट्रॅक्टर पकडून पोलिसांवर विश्वास नसल्याने तहसीलदार यांना फोन करून महसूल पथक बोलावून ते महसूल पथकाच्या ताब्यात देण्यात आले.महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन ते अंबड तहसील येथे आणण्यात आले.या प्रकरणी रीतसर कडक कारवाई करण्यात येईल,असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.