pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

१५ ऑगस्ट रोजी करंजा व कोंढरी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

करंजा रेवस पूल बाधित प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आमरण उपोषण

0 3 8 3 5 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 18

२९६३. ९७ करोड रुपये खर्चाच्या करंजा रेवस पुलाच्या निर्माण कामात प्रकल्प बाधित शेतकरी ग्रामस्थ आणि स्थानिक मच्छिमार आदींना मिळणारा मोबदला, भू संपादन, नुकसान भरपाई, रोजगार, देण्यात येणारे कॉन्ट्रॅक्ट, नोकरी या सर्वांमध्ये होत असलेल्या दिरंगाई बाबत व स्थानिक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता रेवस पुलाचे काम सुरु केल्याने तसेच निष्पाप नागरिकांना, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना धमकविण्याचा प्रकार सुरु झाल्याने या अन्यायाच्या निषेधार्थ करंजा व कोंढरी गावचे प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ हे १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड समोर बेमुदत उपोषण करणार आहेत.

समुद्र किनारी असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत करंजा गावातून सुरु असलेल्या करंजा रेवस पुलाच्या निर्माण कार्याला ऑक्टोबर २०२४ रोजी सुरवात झाली. सदर पुलाचे काम अफकॉन कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. हे काम शासनाच्या एम.एस.आर.डी.सी च्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सुरु करण्यात आले आहे. सदर काम सुरु करण्या अगोदर एम एस आर डी सी शासकीय यंत्रणे मार्फत या मार्गात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना, मच्छिमारांना किंवा प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. शेतकरी, प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ यांच्या सोबत शासनाने कोणतेही चर्चा केलेली नाही. या बाबतीत शासनाने कोणतेही ठोस भूमिका घेतलेली नाही. अफकॉन कंपनीच्या अथवा एमएसआरडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची परवानगी न घेता ड्रीलिंग, पायलिंग, जमीन सर्वेक्षण, जमीन मोजणीचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर काम सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये व प्रकल्पग्रस्तांमध्ये एमएसआरडीसी आणि अफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यां विरोधात प्रचंड संताप, रोष निर्माण झाला आहे. शासकीय अधिकारी वर्गांकडून दडपशाही आणि हुकूमशाही पद्धतीचा वापर करून अफकॉन कंपनी कडुन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त वर्गात संतापाची लाट पसरली आहे. संबंधित कंपनी प्रशासन कडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हे उरण मधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदर ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर करंजा व कोंढरी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दिनांक १७/५/२०२५ रोजी चाणजे ग्रामपंचायत कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे,उपसरपंच श्रीमती कल्पना पाटील,सागर कडू माजी सभापती,सचिन डाऊर सामाजिक कार्यकर्ता,व्यंकटेश म्हात्रे,महेश म्हात्रे सदस्य, प्रकाश पाटील,राजन घरत,प्रकाश थळी, दिनेश म्हात्रे,जगदीश ठाकूर, मेघनाथ थळी,परेश म्हात्रे, मधुकर थळी,निलेश भोईर आदी करंजा आणि कोंढरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

————————————————————–

अफकॉन कंपनी व एम एस आर डी सी हे करंजा व कोंढरी गावातील शेतकरी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थांची मोठया प्रमाणात फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांना धमकविण्याचे व गुन्हा दाखल करण्याचे धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे झालेल्या अन्यायाच्या विरोधात १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थां तर्फे घेण्यात आला आहे.
– सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते तथा करंजा गाव ग्रामस्थ.

———————————————————

आम्ही कोणावरही अन्याय करत नाही.आम्ही कोणाचेही फसवणूक करत नाही.आम्ही शासनाच्या आदेशानुसार काम करीत आहोत.
श्री. कोरे, अफकॉन कंपनीचे अधिकारी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे