3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कालावधीत अवयवदान पंधरवडा

जालना/प्रतिनिधी,दि.4
जिल्हयामध्ये मानवी अवयवाचे अवयवदान पंधरवडा दि.3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये साजरा करण्यांत येत आहे. मृत्यू पश्चात किंवा ब्रेन डेथ (मेंदु मृत) झाल्यावर अवयवाचे दान करता येते. उदा. नेत्रदान, यकृत, हदय, किडनी, फुपुफसे, त्वचा, हाडे व आतडी इ.अवयवाचे दान करता येते. आपण मानवी अवयवाचे दान करु शकतो तसेच अवयव दानाचे महत्व ही संकल्पना जनसामान्य पर्यंत पोहचावी या उद्देशाने अवयव दान पंधरवडा साजरा करण्यांत येत आहे. आवाहन : अवयव दान करा जीवन वाचवा.
अवयवदानासाठी 18 वर्षावरील कोणीही नागरीक स्वखुशीने नोंदणी करु शकतो व ब्रेन डेथ (मेंदु मृत) झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात. जिवंत व्यक्ती व मेंदु मृत व्यक्तीकडुन असे दोन प्रकारे अवयव दान करण्यांत येते. मृत्यू नंतर देहदान करता येते. देहदान केल्यामुळे वैद्यकिय शिक्षण घेणा-यांना त्याचा अभ्यास प्रात्यक्षिक करण्यासाठी उपयोग होतो. जिवंत व्यक्ती कडुन किडनी, स्वादुपिंडचा एक भाग व यकृताचा एक लहान भाग दान करता येऊ शकतो.
अवयवदानासाठी कोणत्याही प्रकारे आर्थिक मोबदला घेणे कायद्याने गुन्हा आहे. अवयव दान करणे सामाजिक जबाबदारी असुन समाजातील गरजवंताला अवयवदानामुळे जीवनदान मिळते हेच अंगदान-जीवन संजीवनी अभियानाचे उदिद्ष्ट आहे. अवयव दानाकरिता देण्यात आलेल्या क्युआर कोडवर स्कॅन करा अथवा नजिकच्या शासकिय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. जयश्री भुसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.




