pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

0 3 9 5 1 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचे शिष्य तथा जेएनपीटीचे माजी विश्वस्त, कामगार नेते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले कॉम्रेड भूषण पाटील हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढून सदर विमानतळाला लोकनेते दिबा पाटील असे नामकरण करावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक २४ जून (लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा १२ वा स्मृती दिन ) पासून कॉम्रेड भूषण पाटील हे जासई येथे आमरण उपोषण करणार आहेत. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे जासई हे जन्मगाव आहे. या जासई गावात दिबा पाटील साहेब यांच्या पुतळ्यासमोर जासई हायस्कूल, ता. उरण, जि. रायगड येथे कॉम्रेड भूषण पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत.

सन २०२० पासून गेली ५ वर्ष नवी मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती तर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यासाठी आंदोलन चालू आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नामकरणबाबत दोन वेळा निर्णय घेण्यात आला आहे व तसा आशयाचा ठराव मंजूरीसाठी १६ जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर याबाबतीत अनेक पाठपुरावा बैठका झाल्या आहेत.लवकरात सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा येथील जनतेला होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव लागावे यासाठी चातकासारखी जनता वाट पाहत आहे. परंतु आज तारखेपर्यंत नामकरणाचा निर्णय मंजूर झाला नाही तसेच नामकरणाबाबत अधिसुचना (नोटीफिकेशन) काढण्यात आली नाही.प्रचंड विलंब झाल्यामुळे येथील जनतेच्या मनात संभ्रम, अविश्वास व असंतोष निर्माण झालेला आहे. आता जनतेच्या सहनशक्तिचा अंत झाला आहे. गेल्या १७ एप्रिलला उदघाटन होणार होता ते झाले नाही.त्यानंतर १५ मे, जून महिन्यात व आता १५ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घाटन होणार आहे अशी माहिती मिळत आहे.अशा वारंवार तारीख पे तारीख होत आहेत.घोषणा वर घोषणा होत आहेत. आश्वासन सुद्धा देण्यात येत आहेत.परंतु आजपर्यंत नावाची अधिसुचना निघाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या नामकरणाची अधिसुचना ताबडतोब काढण्यात यावी.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात विस्थापित, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार देण्यात यावीत या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कॉम्रेड भूषण पाटील यांनी दिली आहे.सदर मागण्या दि. २३ जून २०२५ पर्यंत मान्य न झाल्यास दिनांक २४ जून २०२५ सकाळी १० वाजल्यापासून जासई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशारा कॉम्रेड भूषण पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.मागण्या मान्य झाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा कॉम्रेड भूषण पाटील यांनी घेतला आहे.

जासई येथे आमरण उपोषण करत असल्याचे पत्रव्यवहार कॉम्रेड भूषण पाटील यांनी गृहमंत्री भारत सरकार नवी दिल्ली, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई,नागरी उड्डाणं राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ,व्यवस्थापकीय संचालक सिडको लिमिटेड सिडको भवन नवी मुंबई,मध्यवर्ती टपाल केंद्र मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई,नागरी विमान वाहतूक मंत्री भारत सरकार नवी दिल्ली,नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,लिपिक उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी रायगड जिल्हा अलिबाग,अध्यक्ष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे,सरपंच ग्रुपग्रामपंचायत जासई,अध्यक्ष – महात्मा ज्योतीबा फुले सामाजिक परिवर्तन व प्रबोधन प्रतिष्ठाण जासई आदी ठिकाणी केला आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी आता जनतेतूनही करण्यात येऊ लागली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे