pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंगसंपादकीय

महात्मा फुले : शैक्षणिक विचार व सद्यस्थिती

0 1 1 8 3 4

महात्मा फुले : शैक्षणिक विचार व सद्यस्थिती

भारतीय समाजाच्या क्रांतीकारक परिवर्तनवादी पर्वाचे आपण सिंहावलोकन केले तर आपल्याला असे दिसून येते कि,काळाच्या पूर्वीच काळाचे पुढचे पाऊल उचलून सामाजिक क्रांतीसाठी प्रवाहाला छेद देऊन समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी संघर्ष करणारे,सामाजीक न्याय आणि पूर्नबांधणीचा आयुष्यभर ध्यास घेणारे आद्य समाजसुधारक म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले होय.
प्राचीन वैदिक काळाचा विचार केला तर शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती.ही मक्तेदारी मोडीत काढत सामाजीक परिवर्तन हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘शिक्षण’ हे अत्यंत प्रभावी साधन आहे,हे सर्वप्रथम महात्मा फुले यांनी समाजाला पटवून दिले.सामाजीक समता प्रस्तापित करायची असेल तर समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर ते कर्ते सुधारक होते.महात्मा फुले यांना शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचे जनक म्हणुन संबोधले जाते.शिक्षणाची गंगा ही समाजीतील सर्व स्तरापर्यंत,घरोघरी पोहचली पाहिजे व समाजातील सर्वसामान्यांना तसेच स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांना व्यवस्थेशी बंड पुकारून क्रांतीकारी पाऊल उचलले. महात्मा जोतिबा फुले यांच्या मते शिक्षणाचे सार्वत्रीकरण म्हणजे जात,धर्म,लिंग,शारिरीक अपंगता यांचा अडसर न ठेवता समाजातील सर्व घटकांना समातनेच्या तत्वावर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.शिक्षण हे विषमतेवर आधारित न ठेवता समतेवर आधारित असावे.शिक्षण हे सर्वसामान्यांच्या जीवनविषयक दैनंदिन गरजांशी निगडित असावे.प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत असावे.शिक्षणाला अडसर ठरणा-या रूढी-परंपरा,अंधश्रध्दा या शिक्षणातून दूर कराव्यात.गुणवत्ता वाढीसाठी शाळांची तपासणी करण्यात यावी.शासकीय व खाजगी शाळा सांभाळण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी.व्यवसायभिमुख,व्यवसाय करता येईल अशा शिक्षणावर भर द्यावा.प्राथमिक शाळेतील शिक्षक हा प्रशिक्षित असावा व त्याला पुरेसे वेतन देण्यात यावे.जनतेच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम निश्चित करावा.स्थानिक कर उत्पनाच्या ५०% रक्कम शिक्षणावर खर्च करण्यात यावी.अनुदान मंजूर करणे याचा संबंध निकालाशी जोडण्यात येऊ नये.उच्च शिक्षित पिढीने अशिक्षित लोकांची पिळवणूक करू नये.स्त्रीयांच्या शिक्षणाकरिता आधिकाधिक प्राथमिक शिक्षणाच्या सोयी शासनाने कराव्यात.
महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार व सद्यस्थिती यांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते कि,आजच्या काळात शैक्षणिक प्रगतीच्या आलेख हा पूर्वीपेक्षा नक्कीच उंचावला आहे यात शंका नाही.शिक्षणाच्या सुविधा,आधुनिक उपकरणे,विविध अभ्यासक्रम,दूरस्त शिक्षण,वस्तीगृह,शिष्यवृत्या इ.अनेक बाबी या आजच्या शैक्षणिक परिस्थितीतील अनुकुल ता दर्शवतात.पण सखोल विचार केला तर लक्षात येते महात्मा जोतिबा फुले यांना अभिप्रेत शैक्षणिक प्रगती होण्यासाठी बदल हे अपेक्षित आहेत.त्यात असे सांगता येईल कि,शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे अद्याप पूर्ण झालेले नाही.वाडे-वस्त्या,तांडे या भागात शिक्षणापासून वंचित असणारे घटक अनाथ मुले,ऊसतोड कामगार,मजूर इ.शिक्षणप्रवाहात आणणे गरजचे आहे.तेव्हाच १००% साक्षरता हे उद्दिष्ट हे साध्य होईल.तसेच आजच्या काळात असंख्य तरूणांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे बेरोजगारी होय.हा प्रश्न सोडावयाचा असेल तर शिक्षण जीवनाभिमुख दैनंदिन जीवनाशी निगडित असणे गरजेचे आहे.यासाठी अभ्यासक्रमाची चिकित्सा करणे महत्त्वपूर्ण ठरेल.शिक्षणाला जीवनभिमुख अभ्यासक्रमाची जोड जर परिपूर्ण मिळाली तर सुशिक्षित बेरोजगारांचा असंख्य दिसणारा लोट आपणांस दिसून येणार नाही.त्याचबरोबर सध्याच्या शिक्षण परिस्थितीत गुणांचा फुगवटा व गुणवत्तेचा अभाव ही एक दिसून येणारी वास्तविकता आहे.गुणांचा चढता आलेख गगनाला भिडला असताना मात्र गुणवत्ता खुंटलेली दिसते.वास्तविक जीवनात सत्य-असत्य ओळखण्या इतपत चिकित्सक व तार्किक दृष्टीकोन आजची शिक्षण व्यवस्था ही उद्याच्या भावी पिढीला देऊ शकत नाही.महात्मा फुलेंच्या शाळेत शिक्षण घेणारी मुक्ता साळवे ही चिमुकली जर व्यवस्थेला प्रश्न विचारत असेल तर आजचा उच्च शिक्षित तरूणाला आपल्या अधिकारांविषयी,हक्कांविषयी व्यवस्थेला प्रश्न विचारावा असे का वाटत नसेल? त्याचबरोबर महात्मा फुले यांनी मांडलेला शैक्षणिक संस्थांना अनुदान मंजूर करणे याचा संबंध निकालाशी जोडण्यात येऊ नये हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.कारण अनुदानाचा संबंध निकालाशी जोडला तर साहजिकच शैक्षणिक संस्था गुणांची विक्री करणारी दुकाने बनतील.त्यामुळे गुणवत्ता,मूल्यशिक्षण,सुविधा.इ बाबी या मूल्याकांनात लक्षात घेणे गरजेचे आहे.शिक्षण घेऊन निर्माण होणा-या पिढीत सामाजीक परिवर्तनाला साहाय्यभूत,सामाजीक बांधीलकी जोपासणारे विचार निर्माण होणे गरजेचे आहे.या सर्व बाबींचा विचार केला असता असे दिसून येते कि देशाची,समाजाची उंची ही प्रगतीपथावर नेण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात सद्य स्थितीतील काही अनुकुल बाबी वगळता शिक्षणाचे होणारे बाजारीकरण यावर वेळीच आळा घालून महात्मा फुलेंनी सांगितलेल्या शैक्षणिक विचारांचा अवलंब करणे हितकारक व महत्त्वपूर्ण ठरेल.

-कल्पना कल्याण घुगे,जालना

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4