शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
जालना/प्रतिनिधी,दि.7
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या दूरदृश्यप्रणाली उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन बूधवार, दि. 9 ऑक्टोबर, 2024 रोजी दूपारी 12 वाजता जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित करण्यात आले असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी कळविले आहे.
हा उद्घाटन कार्यक्रम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असुन, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आरोग्य व कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, जालना जिल्हा पालकमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, आमदार सर्वश्री राजेश राठोड, विक्रम काळे, सतिष चव्हाण, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, कैलास गोरंट्याल, राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वै.शि.व संशोधन संचालक डॉ. अजय चंदनवाले, वै.शि.व संशोधन उपसंचालक डॉ. विवेक पाखमोडे उपस्थित राहणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी कळविले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी केले आहे.