pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव अद्याप का नाही, हुतात्मा भवन कागदावरच ?

खासदार-आमदार करतात काय ? महेंद्रशेठ घरत यांचा थेट सवाल

0 3 1 1 4 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

उरण तालुक्यातील पागोटे हे हुतात्म्यांचे गाव आहे, १९८४ च्या आंदोलनात तीन हुतात्मे पागोटे गावाचे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि दिबांच्या असीम त्यागामुळेच साडेबारा टक्के जमिनीचे सूत्र देशभर लागू झाले; परंतु पागोटे येथील समस्या वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहेत. नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान झेपावेल, या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे, परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत अद्याप नोटिफिकेशन का निघाले नाही, हुतात्मा भवनाचे काम का मार्गी लागत नाही, पागोटे गावाला अद्याप अधिकृत मैदान का नाही? त्यामुळे खासदार-आमदार करतात काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना आणि मलाही पडला आहे, असा थेट सवाल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शुक्रवारी (ता. २१) पागोटे येथे पहिल्यांदाच होत असलेल्या
‘काँग्रेस चषका’च्या उदघाटनप्रसंगी विचारला. तेव्हा उपस्थित मान्यवरांनी आणि क्रिकेट रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत यांच्या सवालाचे स्वागत केले.
महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले, हुतात्मा भवनासाठी मी पूर्वीपासून प्रयत्न करतोय, निधी पडून आहे. मात्र हुतात्मा भवन कागदावरच आहे, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे येत्या काळात लढा उभारावा लागला तरी चालेल, पण पागोटे येथे हुतात्मा भवन आणि पागोटे गावाला मैदान मिळालेच पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. मी ना खासदार ना आमदार, तरीही आजपर्यंत सिडकोकडून आठ-दहा गावांना मैदाने मिळवून दिलीत, मग खासदार आणि आमदार करतात काय, असा प्रश्न मला पडला आहे. त्यांनी मनात आणले आणि प्रकल्पग्रस्तांबाबत आक्रमक भूमिका घेतली तर बहुसंख्य प्रश्न सुटू शकतात, असेही महेंद्रशेठ घरत काँग्रेस चषकाच्या उदघाटनप्रसंगी म्हणाले.
आमच्याच बापजाद्याच्या जमिनी आहेत, शतकानुशतके आम्ही येथील भूमिपुत्र आहोत, त्यामुळे गरजेपोटीची घरे भूमिपुत्रांनो बिनधास्त बांधा, नाही तर गावाच्या मोकळ्या जागांवर परप्रांतीय झोपड्या बांधतील, सरकार त्या झोपड्यांना अधिकृत करेल आणि अनुदानही देईल, अशीच आजची राजकीय मानसिकता आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनो वेळीच सावध व्हा, गरजेपोटी घरे बांधाच आणि जमिनीही विकू नका, असा मोलाचा सल्ला महेंद्रशेठ घरत यांनी भूमिपुत्रांना दिला. दिबांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे, असेही ते सरपंच चषक करळच्या उदघाटनप्रसंगी महेंद्रशेठ म्हणाले.

रायगड भूषण लक्ष्मण पाटील, दर्शना माळी, राजेंद्रबुवा पाटील आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डाॅ. मनीष पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, फिशरमन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा, सेवादल जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत, ज्येष्ठ नेते जयवंत पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील लंकेश ठाकूर, मनोहर पाटील, प्रेमनाथ ठाकूर, माजी सरपंच अविनाश घरत, रजनीकांत पाटील,रेखा घरत आदी मान्यवर आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
सरपंच चषक, करळचे आयोजक सूरज तांडेल, सरपंच अनिता तांडेल, माजी सरपंच अरविंद तांडेल आदी मान्यवरही यावेळी होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 1 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
01:57