स्नेहल पालकर आणि अवनी कोळी झाले “साई सन्मान” पुरस्काराने सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
श्री साई देवस्थान साईनगर, वहाळ तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा साई सन्मान पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील अविस्मरणीय कामगिरीबद्दल स्नेहल राम पालकर आणि कु.अवनी अलंकार कोळी यांना प्रदान करण्यात आला. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. स्नेहल राम पालकर यांनी ॲथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. त्यांना केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स अकॅडमी दादरपाडा, कायझन स्पोर्ट्स अकॅडमी खोपोली यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कू. अवनी अलंकार कोळी हिने नेमबाजी डबल ट्रॅप शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिला सिद्धांत रायफल शूटिंग क्लब चे मार्गदर्शन लाभले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्यानंतर दोघांनीही हा पुरस्कार कुटुंबीय, शुभचिंतक आणि वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सहकाऱ्यांना समर्पित केला असल्याची भावना व्यक्त केली. तसेच यापुढे देखील कामगिरीचा आलेख उंचावत ठेवून आणखी नवे खेळाडू घडविण्याची इच्छा व्यक्त केली.या प्रसंगी साई देवस्थान वहाळ चे संस्थापक रविशेठ पाटील, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, पार्वतीताई पाटील, राणी मुंबईकर तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, साईभक्त उपस्थित होते.