म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सफाई कामगारांसह युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांचे होणारे उपोषण स्थगीत !

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
उरण नगरपरीषदेमधील ४३ स्त्री – पुरूष कंत्राटी कामगारांना बेकायदेशीर रीत्या कामावर घेण्याचे ठेकेदार मे. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने दि. २३ /४/२०२५ पासून बंद केले होते. त्याविरुद्ध कामगारांचे उरण नगरपरीषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. ह्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरीता आणि न्याय मिळविण्यासाठी कामगार नेते युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार व बाधीत गरीब दलित – आदिवासी कामगार हे दिनांक १ मे २०२५ रोजी जागतिक कामगार दिनापासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार असे निवेदन स्थानिक प्रशासनापासून मंत्रालया पर्यंत दिले होते.
परंतू या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतल्यानंतर उरण नगर परीषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी समिर जाधव यांनी योग्य विचार करून युनियनला चर्चे करिता बोलावले त्यानंतर अँड सुरेश ठाकूर अध्यक्ष, अनिल जाधव सरचिटणीस, कार्याध्यक्ष संतोष पवार, कोषाध्यक्ष दत्तगुरू म्हात्रे याचे शिष्टमंडळ चर्चे करीता गेले तेथे विस्तृत चर्चा होऊन, कामावरून कमी केलेल्या सर्व ४३ कामगारांना प्रथम उद्या कामावर घेण्याचा निर्णय झाला तसेच नविन ठेकेदार नेमणूक – वर्क ऑर्डर दिली जाणार, किमान वेतनासह , EPF, ESIC योजनेचा लाभ मिळणार.लाड समितीनूसार वारस हक्काच्या नोकऱ्या येत्या १५ मे २०२५ पर्यंत देण्यात येतील असे ठरले. या निर्णयांचे कामगारांनी पेढे वाटून स्वागत केले तसेच गेलेल्या नोकऱ्या केवळ युनियन मुळेच सुरक्षित आहेत अशा भावना कंत्राटी कामगारांनी व्यक्त केल्या. या वेळी कामगार नेते संतोष पवार आणि अनिल जाधव यांनी कामगारांंना मार्गदर्शन करताना सांगितले ही लढाई हार जीतीची नाही तर गोर गरीब सफाई कामगारांच्या न्याय हक्काची होती जे रोज आपले आरोग्य धोक्यात टाकून समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी झटतात या गोर गरीब दलीत आदिवासी बांधवांना केवळ भाषण करून नाही तर कृतीने न्याय मिळणे आवश्यक आहे तर या साऱ्या गोर गरीब बांधवांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकाव लागणार अन्यथा पुन्हा सामाजिक विषमता वाढीस लागेल याकडे सर्वांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर यांनी सांगीतले असेच कामगारांनी एकीने लढले पाहिजे आणि असाच संघटनेवर विश्वास ठेवून एकमेकांना साथ देणे काळाची गरज आहे. एकंदरीत ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड मानून बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.या आंदोलनामध्ये मा. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय पनवेल श्रिमती शितल कुलकर्णी मॅडम, मा. उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग विशाल नेहूल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, ॲड . राजेंद्र मढवी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले . त्यामुळेच १ मे २०२५ पासून नगरपरिषदे समोर सुरू होणारे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी उरण नगर परिषद युनिटचे कामगार प्रतिनिधी मधूकर भोईर, हरेश जाधव, माधव सिद्धेश्वर यांनी मेहता घेतली असे युनियनचे कार्यालय प्रमुख महेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.