आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उरण मधील रोहित शरद घरतने पटकाविले कास्य पदक

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
५० व्या गोल्डन ज्यूबिली युनिव्हरसरी इंटरनॅशनल टूर्नामेंट अँड ट्रेनिंग कॅम्प २०२४ अंतर्गत ११ ते १४ डिसेंबर २०२४ दरम्यान मेणारा, PT ८०,कौला, लुमपूर, मलेशिया येथे गोशीन रियू कराटे असोसिएशन (इंडिया )तर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ८४ किलो व त्या वरील वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे उरण तालुक्याचे सुपुत्र रोहित शरद घरत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक पटकाविले आहे.
मलेशिया येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशातील एकूण २२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गोशीन रियू कराटे असोसिएशन (इंडिया )या संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत उरण तालुक्यातील नवापाडा – दिघोडे येथील रोहित घरत यांनी दमदार कामगिरी करत कास्य पदक मिळवून भारताचे नाव उज्वल केले आहे. सदर स्पर्धेसाठी रोहित घरत यांना सिहान. के. वसंतन, गोपाळ म्हात्रे, शिहान राजु गणपत कोळी, बळीराम घरत, राजू मुंबईकर, निकेश पाटील, राकेश म्हात्रे व आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. परदेशात जाऊन भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रोहित शरद घरत यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच राजू गणपत कोळी इंडिया प्रेसिडेंट यांना सिक्स डान ब्लॅकबेल्ट प्रदान कण्यात आला. त्यांच्यावरही सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.