लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 आचारसंहितेत उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू विक्री विरुद्ध फास…!
एक महिन्यात 94 गुन्हे, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना/प्रतिनिधी,दि.18
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूची अवैध तस्करी रोखण्यासाठी चांगलीच कंबर कसली असून जालना जिल्ह्यात तीन पथकांमार्फत तस्करांवर करडी नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेच्या कालावधीत मागील एक महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 94 गुन्हे दाखल करण्यात आले. 76 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 18 लाख 7 हजार 80 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती जालना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण सहा ठोक विक्रेत्यांकडे सी.सी.टी.व्ही .कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात सी. एल .02 ( देशी मद्य ठोक विक्रेते), एफ एल 1 ( विदेशी मद्य ठोक विक्रेते ) तसेच 02 फॉर्म आय युनिट ( स्पिरिट निर्मिती घटक) यांच्यावर सी.सी.टी.व्ही .कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवली जात असून किमान दहा दिवसांचा बॅकअप ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत असे डॉ. पराग नवलकर यांनी सांगितले.
आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 94 गुन्हे नोंदविण्यात आले. यात 75 वारस गुन्हे असून 76संशयित आरोपींना अटक करण्यात आली. तर संशयितांकडून ( 425.16 लिटर देशी) ( 209.8 लिटर विदेशी) , ( 22.75 लिटर बिअर,) ( 695 लिटर हातभट्टी), ( 300 लिटर ताडी) ( 12,700 लिटर रसायन) असा एकूण 18 लाख 07 हजार 80 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मद्य तस्करी करणाऱ्या सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्याचा सूचना निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. या आरोपींवर कलम 93 अंतर्गत कारवाई करून बंधपत्रांचे उल्लघंन झाल्यानंतर सदरील आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्रेत्यांनी प्रत्येक दिवशी होणारी मद्यविक्रीची माहिती अद्यावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून ही माहिती विभागीय स्तरावर संकलन करण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय कुक्कुटपालन ( पोल्ट्री फार्म) आणि औद्योगिक वसाहतीतील बंद कारखान्यांत अवैध दारू निर्मिती व विक्री होणार नाही याबाबत विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली.
तीन दिवस राहणार ड्राय डे..!
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून यात जालना जिल्ह्यातील परतुर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे .त्या अनुषंगाने बुधवार दि. 24 एप्रिल रोजी सायं. 05.00 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्ण दिवस जिल्ह्यातील पाच कि.मी.अंतरातील अबकारी कर अनुज्ञप्त्या बंद राहतील. तसेच जालना लोकसभा मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान होत असून मतदानापूर्वी 48 तास अगोदर शनिवार दि. 11 मे रोजी सायं. 05.00 वाजेपासून ते दिनांक 13 मे रोजी मतदानाचा पूर्ण दिवस समाविष्ट असलेल्या सर्व अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे डॉ. नवलकर यांनी सांगितले.
शीघ्र पथकास ( क्यु. आर. टी.) माहिती कळवावी…!
अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर भरारी पथकांमार्फत करडी नजर ठेवली जात असून तक्रार आल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्कच्या जालना कार्यालयात शिघ्र पथकाची ( क्यु. आर. टी. )स्थापना देखील करण्यात आली आहे. जंगल व इतर ठिकाणी हातभट्टी दारूची निर्मिती केली जाते, उत्पादन शुल्क विभागाकडून धाडी टाकून उध्वस्त केल्या जात आहेत. विभागीय निरीक्षक आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत गस्त घालून अवैध मद्य विक्री, वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे नमूद करत जिल्ह्यात कुठेही अवैध मद्य विक्री, वाहतूक अथवा बनावट मद्य निर्मिती होत असल्याचे आढळल्यास 18002339999, या टोल फ्री क्रमांकावर किंवा 8422001133 या व्हाटस्एप नंबर वर अथवा excisesuvidha.Mahaonline.gov.in विभागाच्या या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन
अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी केले आहे.