उरण महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर खोपटे बांधपाडा ता. उरण जि. रायगड येथे संपन्न झाले. युवक व माझा भारत युवक व डिजिटल साक्षरता ही शिबिराची मुख्य थिम होती. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विशाल पाटेकर, आय क्यु ए सी समन्वयक डॉ.ए.आर. चव्हाण आदी उपस्थित होते. सबंध सात दिवसीय शिबिरात तलाव परिसर, स्मारक परिसर, तसेच शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश देणारी प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. गावाचे पर्यावरण तसेच महिला सक्षमीकरण इत्यादी विषयांवर कार्य करण्यात आले. शिबिरात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. संजीवन म्हात्रे,जितेंद्र लाड, जयंत ठाकूर, दौलत पाटील, हितेंद्र घरत आदींनी विविध विषयांवर व्याख्याने दिली. समारोपीय कार्यक्रमात महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.महिला सामाजिक कार्यकर्त्या राणी सुरज म्हात्रे व उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. प्राचार्य के.ए. शामा यांनी शिबिरात शिकलेली कौशल्य जीवनात उतरवावीत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती पाटील ने केले तर अहवाल वाचन कु. प्राप्ती पांगुळ हिने केले. स्वागत परिचय कुमारी नम्रता चव्हाण व सोहम जाधव यांनी केले. याप्रसंगी कु. मनीषा मोहिते कुमार शुभम जयस्वाल कुमारी भूमिका गुडेकर व कुमारी भूमिका भोसले आदींनी आपली अनुभव कथन केले. संपूर्ण शिबिराचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले.