pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोककल्याणकारी निर्णयांमुळे जालना जिल्ह्याची समृध्दीकडे वाटचाल

0 1 7 4 1 4

लोककल्याणकारी निर्णयांमुळे जालना जिल्ह्याची समृध्दीकडे वाटचाल

 

जालना हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो.  एकूण आठ तालुके असणाऱ्या या जिल्ह्यात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या व इतर शेतीपूरक उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. बियाणे कंपन्या व इतर उद्योगही या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्टील उद्योगही आहेत. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग व रेल्वे मार्गाने हा जिल्हा जोडला गेला असल्याने विकासाच्या वाटेवर जालना जिल्हा वेगाने प्रगती करीत आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांमुळे जिल्ह्याचा कायापालट होत आहे.

शासनाचा महत्त्वाकांक्षी “शासन आपल्या दारी” हा उपक्रम जालना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अतंर्गत तब्बल एक लाख पेक्षाही जास्त  लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

सर्वसामान्य जनतेने सण सुखासमाधानाने उत्साहात साजरे करावेत यासाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हयातील 3 लाख 31 हजार 588 शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वाटप करण्यात आला आहे.

जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. यामुळे उद्योजकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे.  या प्रकल्पाने जालना आणि औरंगाबादसह मराठवाड्यातले सर्व जिल्हे, तसेच बुलडाणा भागातल्या व्यापार, उद्योग मालाची वाहतूक वेगवान आणि कमी खर्चात होईल. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला आहे. जिल्ह्यात 34 लाख 29 हजार 390 जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच महिलांना एसटी प्रवासात सरसट 50 टक्के सूट या योजनेचा सुमारे 14 लाख 74 हजार 321 महिलांनी लाभ घेतला आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जालना जिल्ह्यातील 1 लाख 69  हजार 288 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून रुपये 42 कोटी 28 लक्ष इतकी लाभाची रक्कम आहे. याच योजनेतंर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेतंर्गत 40 कोटी 28 लक्ष एवढी रक्कम 16  हजार 487 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार जालना जिल्हा भूविकास बँकेकडील 2 हजार 918 कर्जदारांची थकीत  रक्कम व्याजासह सुमारे रुपये  58 कोटी 15 लक्ष 47 हजार इतकी आहे. ही संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह माफ करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 918 शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाल्याने त्यांचे सात-बारावरील बँकेचा बोजा कमी करण्यात आला आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मागील वर्षात 1 लाख 22 हजार 484 लाभार्थ्यांना या योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. तर 21 हजार 243 लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत सन 2022-23 या वर्षात एकूण 51 हजार 222  शेतकऱ्यांना 2 कोटी 75 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेत  स्टेट पुल (सर्वसाधारण) योजनेमधून 41 हजार 919 शेतकऱ्यांना 2 कोटी 24 लक्ष रुपयांचा लाभ व जिल्हा नियोजन समिती (सर्वसाधारण)  योजनेमधून 9 हजार 152  शेतकऱ्यांना  49 लक्ष 74 हजार आणि समाज कल्याण विभागमधून (विशेष घटक) 151 शेतकऱ्यांना  0.57 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतील 25 गावांतून 42.57 किलोमीटरचा हा समृध्दी महामार्ग जातो. या महामार्गामुळे जालना जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली आहे. जालना व बदनापूर तालुक्यांतील सुमारे 25 गावांतून समृध्दी महामार्ग जातो. जालना तालुक्यातील 15 गावे आणि बदनापूर तालुक्यातील 10 गावांचा यात समावेश होतो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराई बाजार अशी या गावांची नावे आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2022  अंतर्गत  4 लाख 71 हजार 844 शेतकऱ्यांना  रुपये 166 कोटी 71 लक्ष नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. तर पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग बहार अंतर्गत 5 हजार 349 शेतकऱ्यांना रुपये 4 कोटी 37 लक्ष नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत मागील वर्षी 38 लाभार्थ्यांना रुपये 76 लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. मृद आरोग्य पत्रिका अभियानातून 9 हजार 160 शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.

मार्च-2023 या कालावधीत अवेळी झालेल्या पावसामुळे जिल्हयातील शेतपिके व इतर नुकसानीपोटी रुपये 3 कोटी 67 लक्ष इतक्या निधीची मागणी  नोंदविण्यात आली होती. तर एप्रिल-2023 या कालावधीत अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिके व इतर नुकसानीपोटी रुपये 6 कोटी 58 लक्ष इतक्या निधीची मागणी  नोंदविण्यात आली होती. या निधी वितरणास मान्यता मिळाली असून ई-पंचनामा या पोर्टलच्या माध्यमातून सदर निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून जिल्हयात नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून 4 हजार 173 हेक्टर क्षेत्रावर करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, जिरेनियम, ड्रॅगन फ्रुट इत्यादी पिके लागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर, दुरुस्ती व इतर लाभासाठी  या वर्षाकरीता रुपये 19 कोटी मंजूर करण्यात आले आहे. 743 लाभार्थ्यांच्या विहीरीचे कामे सुरु झाली असून त्यासाठी रुपये 18 कोटी 13 लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत रुपये 55 कोटी 85 लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून 15 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. रुपये 41 लक्ष 58 हजार अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले  आहे.

शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत जालना जिल्हयातील  363 गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये 54 प्रकारच्या विविध घटकांचा समावेश असून जालना जिल्हयात कामे पूर्ण झालेल्या 75 हजार 757 लाभार्थ्यांना रुपये 500 कोटी 31 लक्ष इतके अनुदान अदा करण्यात आले आहे. या योजनेत प्रामुख्याने शेडनेट हाऊस, सामुहिक शेततळे या बाबींसाठी लाभ देण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात आपला जालना जिल्हा सध्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

–  प्रमोद धोंगडे,

जिल्हा माहिती अधिकारी, जालना

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे