कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ तक्रार चौकशी समितीमधील अशासकीय सदस्यासाठी संस्था, व्यक्तींनी अर्ज करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.20
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 संदर्भातील तक्रारीची चौकशी समितीत अशासकीय सदस्य म्हणून काम करण्यासाठी जालना जिल्ह्यातील महिलांच्या विविध प्रश्नावर काम करत असणाऱ्या इच्छुक संस्था, व्यक्तींनी दि.26 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अन्वये प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये, खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करणे बंधनकारक आहे. या समित्यांमध्ये शासकीय सदस्यांव्यतिरिक्त अशासकीय सदस्यांचा समावेश असावा असे सदर अधिनियमाच्या कलम 5 मध्ये नमुद आहे.
या समितीवर पुर्ण राज्यासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी नमुद समितीवर महिलांच्या विविध प्रश्नावर काम करत असणाऱ्या इच्छुक संस्था, व्यक्ती यांनी अर्ज सादर करण्यासाठी जालना जिल्ह्यातील महिलांच्या विविध प्रश्नावर काम करत असणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सदर समितीवरील सदस्या बाबत अर्ज करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. आधिक माहितीसाठी व अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.