कोकण किनारा मच्छीमार संघटनेच्या शाखा गावोगावी स्थापन करा – के. हेमलता.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6
कोकण किनारपट्टीवर असलेल्या मच्छीमार बांधवांच्या न्याय हक्कासाठी सी.आय. टी.यू च्या अंतर्गत कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात आली असून मच्छीमारांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच विविध मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्व मच्छिमार बांधवांनी एकत्र येत कोकण किनारा मच्छीमार संघटनेच्या शाखा गावोगावी, प्रत्येक ठिकाणी स्थापन करा असे आवाहन अखिल भारतीय सी. आय. टी. यू चे अध्यक्ष के. हेमलता यांनी केले.
6 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप येथे मच्छिमारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात आली असून यावेळी के. हेमलता यांनी मच्छिमारांना मार्गदर्शन केले.कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार बांधव व मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेले जहाज, बोट,नौका वाहक चालक कामगार, मच्छी विक्रेते आदींची संख्या कोकण किनार पट्टीवर मोठ्या प्रमाणात आहे. या मच्छीमार बांधवाच्या विविध समस्या वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. तसेच नवनविन होणाऱ्या कायदयामूळे मच्छीमार बांधवांच्या मूलभूत हक्क व अधिकारावर गदा येत असून नैसर्गिक संकटाबरोबरच मानवनिर्मित संकटालाही या मच्छीमार बांधवाना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत मच्छिमार बांधवांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.त्यामुळे मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने व मच्छीमार बांधवाना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने सी. आय.टि. यू या डाव्या विचाराच्या संघटनेतर्फे कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे सांगत के. हेमलता यांनी मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी व समस्या सोडविण्यासाठी गावोगावी शाखा स्थापन करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या.
कार्यक्रमात प्रास्तविकेत संदिप पाटील यांनी संघटना स्थापन करण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केली. कॉम्रेड भूषण पाटील यांनी मच्छिमार यांना भेडसावत असणाऱ्या प्रश्नांना, अन्यायाला वाचा फोडली. व मच्छिमारांच्या काय मागण्या आहेत हे सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितले. मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे भूषण पाटील यांनी सांगितले.मारोती पाटील, जितेंद्र कोळी, सुनील पाटील यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.संघटनेचे सभासद होण्यासाठी प्रवेश फी एक रुपया व वार्षिक फी 60 रुपये असे एकूण 61 रुपये भरून संघटनेचे सभासद होता येते असे सांगत जास्तीत जास्त मच्छिमारांनी या संघटनेचे सभासद व्हावे असे आवाहन संदिप पाटील यांनी केले.या कार्यक्रमाला अखिल भारतीय सी आय टी.यूचे अध्यक्ष कॉ. के हेमलता,सी आय टी यूचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल कराड, महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी एम. एच.शेख, महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी भूषण पाटील, फॉरवर्ड सिमेन्स यूनियनचे अध्यक्ष मनोज जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधूसूदन म्हात्रे, फॉरवर्ड सिमेन्स यूनियन उपाध्यक्ष शुशिल देवरुखकर, सी. आय.टी यू मुंबई अध्यक्ष के नारायणन, रायगड सेक्रेटरी शशि यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप पाटील, सुरेश कोळी, मारुती पाटील,दिलीप पाटील, काशिनाथ पाटील यांच्यासह मच्छिमार बांधवांनी तसेच सीआयटीयुच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मच्छिन्द्र म्हात्रे यांनी केले. या नवीन संघटनेच्या स्थापना सोहळ्याला मच्छिमार बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे :-
1) मच्छिमारांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण करा.
2)जून, जुलै मासेमारी बंद असलयाने उदर निर्वाह भत्त्या द्या.
3)प्रकल्प बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
4)मच्छिमारांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा व मुलांना शैक्षणिक सुविधा द्याव्यात
5)मच्छिमारांना म्हातारपणी पेन्शन द्यावी.