मोर्शी तालुक्यात सायवाडा ते खेड रस्त्यावर अपघात

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.16
मोर्शी : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी वरील एका २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर आहे. त्याला उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. ही अपघाताची घटना शनिवारी दि. 16 जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सायवाडा ते खेड रस्त्यावर घडली. मृत युवकाचे नाव किरण उईके वय २९ असे आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायवाडा येथील किरण उईके व त्याचा सहकारी गोविंदा युवनाते वय २६ वर्ष हे दोघे मोटरसायकल क्र. एम एच 27 एके 3301 ने सायवाडा येथून खेड येथे मजुरीकरीता जात होते. दरम्यान खेड येथून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात किरण उईके याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला दुसरा युवक गोविंदा युवनाते याला गंभीर मार लागला.
अपघाताची माहिती मोर्शी पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल व त्यांचे अधिनस्त पथक घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर अवस्थेत असलेल्या गोविंदा युवनाते या युवकावर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केल्यानंतर त्याला अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मोर्शी पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा नोंद केला असून ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.