नेहरु युवा केंद्रातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकासाठी अर्ज करावेत
जालना/प्रतिनिधी,दि.6
भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा कोर योजनेअंतर्गत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर नेमण्यात येणार आहेत. विहीत अर्जाच्या नमुना नेहरू युवा केंद्र संगठनच्या www.nyks.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रासह नेहरू युवा केंद्र जालना येथे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
भारत सरकार तरुणांना ‘डिजीटल कृषी मिशनच्या’ अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेऊ इच्छित आहे. तसेच युवांना स्वयंसेवी गटांमध्ये संघटित करून त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी वापरण्यासाठी उत्सुक आहे. स्वयंसेवकांना आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लिंगभेद आणि इतर सामाजिक समस्यांवर आधारित मोहिमा, जागरूकता कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सांगितले जाऊ शकते आणि आपत्कालीन परिस्थितीत किंवा विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यकतेनुसार प्रशासनाला मदत करण्यास सांगितले जाऊ शकते.
उमेदवार किमान पदवी शिक्षण घेणारा किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर, वय 18 ते 29 वर्षादरम्यान असावे. उमेदवार ज्या तालुक्यासाठी अर्ज करीत आहे त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ज्यांनी पूर्वी या पदावर काम केलेले आहे ते अर्ज करण्यास पात्र नसतील. प्रत्येक तालुक्यात 3 स्वयंसेवकांची जास्तीत जास्त तीन महिने किंवा किमान 15 दिवसांसाठी कामाच्या आवश्यकतेनुसार निवड करण्यात येईल तसेच त्यांना प्रति महिना 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. ही सेवा पगारी नोकरी तसेच कायमस्वरूपी नाही. स्वयंसेवकाला सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्याचा कायदेशीर अधिकार नसेल. अधिक माहितीसाठी पत्ता- 3-16, नरीमन नगर, रेल्वे स्टेशन जवळ, जालना – 431213, ई-मेल : qnykjalna@gmail.com, संपर्क क्रमांक: 7875464703 येथे संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.