संकटग्रस्त बालकांना मदत मिळवून देण्यासाठी 1098 हेल्पलाईन येता संकट बालकांवरी 1098 मदत करी
जालना/प्रतिनिधी,दि. 22
संकटग्रस्त बालकांना तात्काळ मदतीसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे. तरी जागरुक नागरिकांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत मिळवून द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळ्यास अश्या बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, या करिता कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.