खानापूर येथील प्राथमिक शाळेत दुहेरी सोहळा: पाचवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप, नवागतांचे जल्लोषात स्वागत

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.22
टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या खानापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी एक अनोखा दुहेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी भावपूर्ण निरोप देण्यात आला, त्याचबरोबर नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व गावातील शिक्षण प्रेमी श्री रामदास गणेश शेळके सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. “आपल्या शाळेविषयी नेहमी आदर ठेवा. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहात. त्यासाठी नेहमी मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाने अभ्यास करत राहा,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विश्वास शेळके,सदस्य श्री कौतिक तायडे व श्री रामदास घोरपडे,ग्रामपंचायत कर्मचारी श्री गजानन तुकाराम शेळके यांच्यासह मुख्याध्यापक श्री गिते सर,सह शिक्षिका श्रीमती कायंदे मॅडम,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. तर इयत्ता पहिलीतील नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना जिलेबी आणि भजे यांचा नाश्ता देण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




