मानवी अधिकार दिन उत्साहात संपन्न सर्व भारतीयांनी बंधुता संकल्पना मनात रुजवावी – सरकारी अभियोक्ता वर्षा मुकीम
जालना/प्रतिनिधी,दि.10
10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे तत्व नमुद केले आहेत. या चार तत्वांचे पालन म्हणजेच मानवी अधिकार होय. नागरिकांनी आपल्यासह दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा प्रथमत: विचार करणे गरजेचे असून सर्व भारतीयांनी बंधुता संकल्पना मनात रुजवावी, असे प्रतिपादन सरकारी अभियोक्ता वर्षा मुकीम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात मंगळवार दि.10 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता मानवी हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. महेश धन्नावत, तहसीलदार प्रणाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरकारी अभियोक्ता श्रीमती मुकीम म्हणाल्या की, 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 30 मानव अधिकाराचे घोषणापत्र स्विकारले. तर 1993 पासून भारतात मानव अधिकार कायदा लागू करण्यात आला. आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन झाला. भारतीय संविधानाने दिलेले हक्क हिरावल्यास ते मिळवून देण्याचे काम मानवाधिकार आयोग करतो. जीवनात मानवाला उत्कर्ष साधायचा असेल तर सर्वांना माणसाप्रमाणे जगू देणे महत्वाचे आहे. प्रत्येक मानवाला नेहमी आपल्या कर्तव्याची जाण हवी. मानवाची उत्क्रांती सांगुन समाजात जीवन जगत असतांना झालेल्या स्थितीबदलाचा आलेखही त्यांनी यावेळी मांडला.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.महाडिक म्हणाले की, भारतामध्ये जन्मताच जे हक्क प्राप्त होतात ते मुलभूत हक्क भारतीय संविधानात सर्वांना समान देण्यात आले आहेत. भारतीय संविधानाने बहाल केलेले अधिकार हे जबाबदारीशिवाय पुर्ण होत नाहीत याची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना सुखी व आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे.
आपले कर्तव्य सचोटीने पार पाडले तर मानवी हक्क अबाधित राहतील. भारतातील सर्व नागरिकांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समान हक्क दिलेले आहेत. समाजातील गरीब व्यक्तीला न्यायालयात जाण्यासाठी विनामुल्य वकीलांची सहाय्यता मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. धन्नावत यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रणाली तायडे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.