भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे विविध मागण्यांसाठी २६ मे पासून सीबीडी बेलापूर सिडको कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
सिडको प्रशासनाशी निगडीत प्रकल्पग्रस्तांचे जे विविध प्रश्न गेली ४० वर्षे सुटलेले नाहीत ते योग्य रितीने सोडविण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी )रायगड, नवी मुंबई तसेच सीआयटीयु ,अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.के.वाय.एफ.आय च्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते सी.बी. डी. बेलापूर येथील सिडको भवन कार्यालय समोर २८ एप्रिल २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलनात बसले होते.परंतु भारत पाकिस्तान युद्धामुळे देशहितासाठी सदर बेमुदत धरणे आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले होते.आता युद्धविराम झाल्यामुळे धरणे आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे एका प्रसिद्धीपत्रका द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.सन २००८ पासुन अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने १२.५०% योजनेच्या प्लॉटची लॉटरी काढून इरादा पत्र दिले आहे परंतु आज तागायत प्लॉटचा ताबा दिलेला नाही. मात्र नवीन भुसंपादनामध्ये २२.५०% योजनेचे प्लॉट दिले जात आहेत. तरी प्रथम १२.५०% योजनेसाठी तयार प्लॉटचे वाटप करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सदर सुरु झाले आहे. तसेच ज्यांना वाढीव पेमेंट मिळालेला आहे. त्यांना मावेजा भरावा लागत आहे तो रद्द करावा व ज्यांचे वाढीव नुकसान भरपाईच्या रक्कमेचे निकाल लागले परंतु आज सुद्धा पेमेंट दिले नाही ते पेमेंट त्वरीत मिळण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गरजेपोटी घरांसाठी सप्टेंबर २०२४ मध्ये जीआर (शासन निर्णय )काढला आहे तो प्रकल्पग्रस्तांना घातक आहे. कारण जमीन नावावर झाली तरी बांधकाम बेकायदेशीरच राहते तसेच प्रकल्प ग्रस्तांचे प्लॉट देताना सिडकोने आगोदरच बांधकाम रिपोर्ट नुसार प्रकल्प ग्रस्तांचे, नागरिकांचे प्लॉट कापलेले आहेत. तरी सुद्धा बांधकामे बेकायदेशीर ठरवलेली आहेत. म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे दोन्ही बाजूने नुकसानच आहे. नवीन आलेला यु.डी.सी.पी.आर. हा लागू होत असल्याने बांधकाम करणे कठीण होईल व जीआर (शासन निर्णय )लागू झाल्यास प्रकल्प ग्रस्तांना क्लस्टरमध्ये घातले जाईल म्हणजे झोपडपट्टी योजना (एसआरए ) लावली जाईल. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व आपला मालकी हक्क अबाधित राखण्यासाठी २६ मे रोजी नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर सिडको कार्यालय समोर होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी )रायगड, नवी मुंबईच्या वतीने तसेच सीआयटीयु,अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.के. वाय.एफ.आय च्या वतीने करण्यात आले आहे.