डाऊर नगर शाळेत शारदोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
जागर शिक्षणाचा..सन्मान मातांचा….हे घोषवाक्य घेऊन मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन करून डाऊर नगर शाळेत शारदोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला.या शारदोत्सवा अंतर्गत आंतरशालेय स्तरावर संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, गरबानृत्य स्पर्धा,काव्य गायन स्पर्धा, मेहंदी काढणे, गोणता उडी शर्यत आदि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे १४० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.विजेत्या स्पर्धकांचा प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम व्दितीय तृतीय क्रमांकासाठी शैक्षणिक व स्वच्छतेबाबत भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. मातांचा सन्मान म्हणून निपुण भारत अभियाना अंतर्गत दोन वेळा माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस उपस्थित मातांना साधन व्यक्ती प्रतिभा तायडे पंचायत समिती उरण यांनी मुलांचा घरी अभ्यास कसा घ्यावा या बाबत मार्गदर्शन केले.नवव्या माळीचे औचित्य साधून द्रोणागिरी माता मंदिर आणि करंजा बंदर परिसराला भेट देण्यात आली. सदर शारदोत्सवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उज्ज्वला गावंड,शिक्षण प्रेमी सदस्य कैलास भोईर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माता पालकांनी भेट देऊन उपक्रमाचे व मुलांचे कौतुक केले.सदर महोत्सव यशस्वी होण्यासाठी निलिमा म्हात्रे, देविदास पाटील,महेंद्र गावंड, जयदास कोळी, श्रीम.रूपाली म्हात्रे आदि शिक्षक बंधू भगिनींनी विशेष मेहनत घेतली.