आयटीआयमध्ये इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
जालना/प्रतिनिधी,दि.6
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून, मराठवाडा अॅक्सेलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (MAGIC) च्या सहकार्याने, जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे देशातील पहिले -कॅम्पस आधारित इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत 10 हजार चौ. फुट क्षेत्रफळ असलेली जागा मॅजिक संस्थेस उपलब्ध करून देण्यात आली असून, संस्थेच्या माध्यमातून ‘मॅजिक-जालना आयटीआय इनोव्हेशन टेक्निकल चॅलेंज 2025’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले असून, जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, मॅजिकचे संचालक रितेश मिश्रा, उद्योजक नितीन काबरा, अनुज बन्सल, आयटीआय जालना येथील प्राचार्या सौ. रजनी शेलके आणि मॅजिकचे इन्क्युबेशन मॅनेजर शशिकांत तिवारी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण, तांत्रिक कल्पना मागवण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व स्टार्टअप किट देण्यात येणार असून, टॉप सहा टीम्सना थेट मॅजिक आयटीआय इन्क्युबेशन सेंटरमध्ये मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.
या इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना महाराष्ट्र स्टार्टअप धोरण 2018 अंतर्गत मांडण्यात आली होती. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आयटीआय कॅम्पसमधून स्थानिक समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधणे व ग्रामीण भागातील स्टार्टअप्ससाठी सक्षम पारिस्थितिकी तंत्र निर्माण करणे हा आहे. मॅजिकमार्फत उभारले जाणारे हे केंद्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन, प्रोटोटायपिंग, मॉडेलिंग व टेस्टिंग लॅब्ससारख्या अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यास सज्ज होत आहे.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) या मॉडेलवर आधारित असलेले हे केंद्र ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर उभारले जाणारे देशातील पहिले आयटीआय आधारित इन्क्युबेशन सेंटर ठरले आहे. याचा लाभ जालना जिल्ह्यातील आठ शासकीय व चार खासगी आयटीआयमधील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, नवउद्योजक व स्थानिक उद्योगा मिळणार आहे. या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यात तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा नवा अध्याय सुरू झाला असून, मराठवाड्यातील टियर-2 व टियर-3 शहरांतील युवकांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे



