पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण

जालना/प्रतिनिधी, दि.1
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार अर्जूनराव खोतकर, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, सरिता सुत्रावे, मनिषा दांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची उपस्थिती होती
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेल्या बैठकीत त्यांनी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वयित करणेबाबत निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सौरऊर्जा केंद्र, पालकमंत्री कक्ष, तसेच इतर विभागाच्या प्रशासकीय कार्यालयाची पाहणी केली. सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय एका नवीन रुपात सज्ज झाले आहे. याचा फायदा जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला नक्की होणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या.