शहीद जवान किशोर पारवे यांच्या पार्थिवावर साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जालना/प्रतिनिधी, दि.11
जाफराबाद येथील शहीद जवान किशोर पारवे यांच्या पार्थिवावर जाफराबाद शहराजवळील सावरखेडा रोडवरील त्यांच्या शेतात विराट जनसमुदायांच्या साक्षीने ‘अमर रहे अमर रहे, शहीद किशोर पारवे अमर रहे’ च्या जयघोषात साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद किशोर पारवे यांच्या पार्थिवाला मुलगी खुशी व भाऊ मिलिंद पारवे यांनी अग्नीडाग दिला. यावेळी पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच सैन्य दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी बँड पथकाने शोकधून वाजविली.
सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे सहवाहनचालक पदावर कार्यरत जवान किशोर पारवे 8 ऑगस्ट रोजी रस्त्यावरुन चारचाकी वाहन घसरुन दरीत कोसळल्याने शहीद झाले. सैन्यात 17 वर्षे सेवा केलेल्या पारवे यांचे मूळ युनिट 18 महार रेजिमेंट होते. 7 ऑगस्ट रोजी सेवोक रोड येथून वाहनातून अभियांत्रिकी सैन्य सामग्री भांडार सिसी (कुपूप) येथे ठेवण्यासाठी त्यांना सहचालक म्हणून नेमण्यात आले होते. काम आटोपल्यानंतर तिथून 8 ऑगस्ट 2023 रोजी परत येताना चार चाकी वाहन माइलस्टोन फाईव्ह जवळ अंदाजे रोडच्या खाली घसरून दरीमध्ये कोसळले त्यात चालक व सहचालक दोघेही शहीद झाले.
शहीद किशोर पारवे यांचे पार्थिव औरंगाबाद येथे दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी रात्री आणण्यात आले. त्यानंतर दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी जाफराबाद या त्यांच्या गावी राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. दर्शनासाठी नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर तिरंग्यात आच्छादलेल्या किशोर पारवे यांच्या पार्थिवाची जाफराबाद शहरातून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली.
किशोर पारवे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, आई असा परिवार आहे. पाच वर्षेपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शहिद किशोर पारवे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा जाफराबाद शहरातील पुर्णा नदी, एकलव्य चौक, हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम चौक,डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौक,अहिल्यादेवी होळकर चौकातुन पारवे कुटुंबियांच्या शेतात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आली. यावेळी देशभक्ती पर गीतांचा निनाद, विर जवान अमर रहे, शहीद जवान किशोर पारवे अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय.. या घोषणांनी परिसर दुमदुमला, तिरंगा घेऊन विद्यार्थी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सावरखेडा येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात किशोर पारवे यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. बौध्द धम्म पध्दतीने अंत्यविधी पूर्ण करण्यात आला.
यावेळी आमदार संतोष दानवे पाटील, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक तुषार जोशी, तहसीलदार सरिता भगत, मेजर डॉ.निलेश पाटील (निवृत्त) यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी पार्थिवाच्या दर्शनासाठी विराट जनसमुदाय उपस्थित होता.