मध्यप्रदेशातील मजुरांची बोलेरो उलटली:मोर्शी जवळील भीषण अपघातात एक ठार, नऊ जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.13
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील आष्टगाव-खानापूर मार्गावर रविवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. एच जी इन्फ्रा कंपनीच्या मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप उलटली. या अपघातात एक मजूर ठार झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.मृत मजुराची ओळख राकेश पाटील २२ अशी झाली आहे. जखमींमध्ये पप्पू काजदे २० आणि राजा काजळे २२ यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.चांदूर बाजार येथील प्लांटवरून मोर्शीकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप एमएच २७ एक्स ८६०१ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन उलटल्यानंतर एक मजूर त्याखाली दबला. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केले. त्यांनी वाहन सरळ करून जखमींना बाहेर काढले. इतर जखमींमध्ये मुजा कासदे, सुनील कासदे, रंगभाऊ श्रीपाद यादव, सालक राम सालवे, लालसिंग कासदे आणि अर्जुन चिराले यांचा समावेश आहे. मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सचिन कोरडे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. मोर्शी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.