करजगाव-जावरा मार्गावर जीव घेणे खड्डेच खड्डे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.8
तिवसा तालुक्यातील करजगाव, जावरा-फत्तेपूर रस्त्यासह वणी सुलतानपूर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नमस्कारी, काटसुर, इसापूर, सुलतानपूर, वरुडा, दापोरी आदी गावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरुन वाट काढावी लागत आहे.
हा रस्ता १८ किलोमीटर लांबीचा आहे. राष्ट्रीय महामार्ग सहापासून ममदापूर मार्गे तो पुढे गेला असून तिवसा-चांदूरबाजार राज्य महामार्गसह करजगाववरून जोडल्या गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर आठ ते दहा गावातील शेकडो नागरिकांची तिवसा या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा सुरु असते. परंतु रस्त्याची स्थिती दयनीय झालेली असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असा हा जीवघेणा प्रवास थांबविण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी पुढे आली आहे.विशेष म्हणजे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रेती घाट आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्याने बैलबंडी सह साधे पायी चालणेसुद्धा कठीण झाले असून नागरिकांना दररोज अनेक छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. त्यामुळे तिवसा पं.स. च्या उपसभापती रोशनी पुनसे यांच्यासह ग्रामस्थांनी ही मागणी तत्कालीन आमदार अँड. यशोमती ठाकूर यांचेकडेही लावून धरली होती. दरम्यान रस्त्यावरील रेती घाट व त्यावर होत असलेली रेतीची जड वाहतूक आदी बाबी विचारात घेता हा रस्ता विशेष प्राधान्याने दुरुस्ती करण्याच्या सूचनासुद्धा तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.दरम्यान या रस्त्याची दुरुस्ती तातडीने केली जावी. अन्यथा अन्नत्याग आंदोलनाच्या स्वरूपात व्यापक जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा सामजिक कार्यकर्ते मुकूंद पूनसे यांनी दिला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद मसलदी, हैबतराव गाडगे, रवी जवंजाळ, दशरथ कठाने, शामभाऊ कोंडे, प्रकाशराव गाढवे, विनोद मोंढे, सुधीर लवणकर, निवृत्ती मुकद्दम उपस्थित होते.संबंधित यंत्रणेकडून तातडीने रस्त्याचे सर्वेक्षण करून अंदाज पत्रकांसह परिपूर्ण प्रस्ताव हा अंतिम मंजुरी करिता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय मुंबई यांच्या कडे पाठविण्यात आला होता. एवढेच नाही तर आमदार ठाकूर यांच्याच पाठपुराव्यामुळे ५० लाख रुपयाचा निधीही जि.प.अमरावती यांच्या कडून मंजूर करण्यात होता. पण तरीही काम अद्याप सुरु झाले नाही.