“शासन आपल्या दारी” अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालन्यात नियोजित कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि. 19
“शासन आपल्या दारी” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना शहरात दि. 25 जून 2023 रोजी नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली.
जिल्हा परिषदेतील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व विभाग व तालुका, ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषी, महसूल व इतर सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी” अभियानातंर्गत प्राप्त लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पांजरपोळ मैदान येथे दि. 25 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. दानवे यांनी विविध सूचना केल्या. कार्यक्रम स्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा.