जालना शहरातील घरगुती व सार्वजनिकरित्या स्थापन झालेल्या श्रीगणेशांचे विसर्जनासाठीची जालना शहर महानगरपालिकेतर्फे तयारी
जालना/प्रतिनिधी, दि.16
दरवर्षी प्रमाणे दिनांक १७.०९.२०२४ रोजी अनंत चतुदर्शीच्या दिवशी श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. जालना शहरातील घरगुती व सार्वजनिकरित्या स्थापन झालेल्या श्रीगणेशांचे विसर्जनासाठीची तयारी जालना शहर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे. पर्यावरणपुरक विसर्जन होण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, घरगुती श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन महानगरपालिकेने मोती तलावाजवळ निर्माण केलेल्या कृत्रिम कुंडामध्येच करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन कोणत्याही सार्वजनिक पाणवठयावर उदा. मुक्तेश्वर तलाव, घाणेवाडी तलाव, बंधारे यामध्ये करावयाचे नाही.
सार्वजनिक व मोठया आकाराच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी औरंगाबाद चौफुली-एमआयडीसी रोड मार्गे मोती तलाव या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ सार्वजनिक गणेश मंडळांनाच परवानगी असुन घरगुती गणेश मुर्ती या ठिकाणी विसर्जित करु नयेत. विसर्जन स्थळावर निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्या व्यवस्थेचा वापर करावा. परिसरात निर्माल्य पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. मनपा कर्मचारी, पोलीस विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या सुचनांचे पालन करावे. विसर्जन स्थळावरील बॅरिकेटींगच्या पुढे तलावाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असुन नागरिकांनी सहकार्य करावे. विसर्जन स्थळी व मार्गावर कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व गणेश भक्तांनी काळजी घ्यावी व सहकार्य करावे.