मतमोजणीची प्रक्रिया जबाबदारी व निष्ठेने पार पाडावी — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
मतमोजणीशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.28
सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी व निष्ठेने कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली.
मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार आदींसह नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मतमोजणी हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे. सर्वप्रथम आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी काळजीपूर्वक समजून घ्यावी. निवडणुक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. मतमोजणी केंद्रातील संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन करावे. सुरक्षा, पार्किंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था सज्ज ठेवाव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर जाऊन व्यवस्थेची पाहणी करावी. आवश्यक सुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात.
यावेळी श्री. हदगल यांनी मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सादरीकरणाव्दारे त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.