लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 नामनिर्देशन दाखल प्रक्रियेसाठी वाहतूक मार्गात बदल

जालना/प्रतिनिधी,दि.18
जालना लोकसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने 18 एप्रिल 2024 पासुन उमेदवारांचे नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जालना येथे उमेदवार हे नामनिर्देशन प्रक्रियासाठी आपले कार्यकर्त्यांसह तथा वाहनासह मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने वाहतुकीच्या नियमनासाठी सदर मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी आदेश जारी केले आहेत.
दि. 18 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते दुपारी 4.00 पर्यंत खालील प्रमाणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नाव्हा रोड-मंठ रोड-घनसावंगी रोड-रेवगांव रोडकडून येणारी व अंबड चौफुली मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही मंठा चौफुली नाव्हा चौफुली-कन्हैयानगर नविन मोढा मार्ग, छत्रपती संभाजीनगरकडे जाईल व येईल.
अंबड कडुन येणारी व अंबड चौफुली मोतीबाग मार्गे छत्रपती संभाजीनगर- भोकरदनकडे जाणारी वाहतुक ही मंठा चौफुली-नाव्हा चौफुली-कन्हैयानगर- नविन मोंढा मार्गे जाईल व येईल. छत्रपती संभाजीनगरकडुन येणारी व मोतीबाग- अंबड चौफुली मार्गे अंबड- मंठाकडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टि पोइंट- नविन मोंढा- कन्हैयानगर मार्गे जाईल व येईल. हा बदल दि. 18 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते दुपारी 4.00 पर्यंत असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.