‘पायखुटी’ कादंबरीत ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन – डॉ प्रमोद कुमावत

‘पायखुटी’ कादंबरीत ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन – डॉ प्रमोद कुमावत
(विशाल देशमुख) ग्रामीण कथा लेखक तथा कादंबरीकार छबुराव भांडवलकर यांच्या लिखाणातून ग्रामीण शेतकरी, कष्टकरी, पीडित समाजाचे यथार्थ दर्शन होते किंबहुना ग्रामीण जनजीवन हाच भांडवलकरांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत यांनी केले.
शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बुधवारी (दि. १७) ग्रामीण साहित्यिक छबुराव भांडवलकर लिखित पायखुटी’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. प्रमोद कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. भारत खंदारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी निवृत्त प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, जीवन विद्यार्थी प्रतिष्ठानचे दीपकराव कुलकर्णी, प्रा. डॉ. राम निकम, प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे, प्रा. डॉ. यशवंत सोनुने,प्रा. बसवराज कोरे, अंकुश मोरे, सुरेश राऊत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. कुमावत म्हणाले की, छबुराव भांडवलकर यांच्या लिखाणातून ग्रामीण जीवनाचे वास्तववादी दर्शन होते. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, पीडित समाज हा भांडवलकरांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, सततची नापिकी, वाट्याला येणारा ओला व कोरडा दुष्काळ, ग्रामीण समाजकारण, राजकारण हे व इतर अनेक विषय भांडवलकरांनी आपल्या लिखाणातून लिलया हाताळले आहेत. बालपणापासून ग्रामीण जीवनाशी जोडलेली त्यांची नाळ निवृत्तीनंतरही कायम आहे हे विशेष. त्यांनी लिहिलेली पायखुटी ही कादंबरी ग्रामीण जीवनाचे यथार्थ चित्रण घडविते. एखाद्या कामात अपयश आल्यास माणसाने खचून जाऊ नये. निराश होऊ नये. नकारात्मक विचार मनात आणू नये. सकारात्मक विचार करावा. आत्महत्या हा कुठल्याही वेदनेवरचा उपाय नाही. आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीतीत आत्महत्या करू नये हे या कादंबरीतून शिकायका मिळते. सोबतच कादंबरी वाचताना वाचकाला ग्रामीण जनजीवनाचे वास्तववादी दर्शनही होते. कादंबरी उत्साहवर्धक आहे. कादंबरीतील मुख्य नायक रमेशच्या जीवनात आता पुढे काय होईल याची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत जाते. एकंदरीत अतिशय मार्मिक असे लिखाण या कादंबरीत दिसते. यावेळी निवृत्त प्राचार्य डॉ. दिरंगे, रावसाहेब ढवळे, तौर, बसवराज कोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक रमेश आढाव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लंका सोनवणे यांनी केले तर प्रा. आशिष गारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्य प्रेमी मंडळी, आविष्कार साहित्य मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



