व्हाटस ग्रुपमुळे एकत्र आलेल्या ३६ वर्षांपूर्वीच्या मित्र मैत्रिणींनी जपली सामाजिक बांधिलकी!!
शांतिवनातील बुजुर्गांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू ! बहारदार संगीताच्या मेजावानीसह केले फळवाटप !! मागील ९ वर्षे दरवर्षी मकर संक्रातीच्या निमित्ताने विद्यार्थ्याची ही बॅच राबवत आहे विविध खास उपक्रम

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
उरणच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या १९८९ च्या दहावी बँचच्या विद्यार्थ्यांनी पनवेलच्या नेरे येथील शांतिवनातील बुजुर्गांसोबत आपला दिवस व्यथित करीत तेथील वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले . वर्गातीलच काही प्रख्यात गायक असलेल्या मित्र मैत्रीणीनीं या बुजुर्गांसमोर जुन्या नव्या गाण्यांची सुमारे तीन तासांची मैफल सादर करून ” कभी अलविदा ना कहेना ” या भावस्पर्शी गिताने सर्व बुजुर्गांना देखील आपल्या सोबत डोलायला लावले . त्याचबरोबर या सर्व बुजुर्गांसोबत सकाळची न्याहारी आणि फळांचा आस्वाद घेत आपल्याच घरच्यांची सेवा केल्याचे आत्मिक समाधान मिळविले. ३६ वर्षांपूर्वीचे हे १९८९ च्या दहावीच्या वर्गातील सर्व मित्र मैत्रिणी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत . त्यात कुणी शिक्षक आहेत तर कुणी सरकारी विविध खात्यात नोकरी करीत आहेत. त्याचबरोबर सीमेवर देशसेवा करून आलेले मेजरसह डॉक्टर , वकील , पत्रकार , खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही सर्व मंडळी आहे. त्यांनी नेरे शांतीवन येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील बुजुर्गांचे आशीर्वाद घेत आपले सामाजिक दायित्व जपण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मागील ९ वर्षे दरवर्षी मकर संक्रातीच्या निमित्ताने या विद्यार्थ्याची ही बॅच हा खास उपक्रम राबवित आहे उरणच्या पूर्व भागातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन आणि भागशाळा खोपटे चे १९८९ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी ” मैत्री असावी तर अशी ” या सोशल मीडियावरील व्हाटस अप ग्रुपच्या माध्यमातून मागील दहा बारा वर्षांपासून एकत्र आलेले आहेत . त्या निमित्ताने मागील काही वर्षांपासून या ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यात आपल्याच ग्रुपमधील सेवानिवृत्त मेजर संतोष गावंड यांचा सत्कार , विविध क्षेत्रात उत्तम ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार , दरवर्षी वनभोजन , वृद्धाश्रमात तिळगुळ वाटप , फळे वाटप आणि बुजुर्गांचे गाण्यांच्या मैफलीतून मनोरंजन अशा प्रकारचे कार्यक्रम अगदी हटकून केले जातात. यावर्षी देखील या कार्यक्रमाचा भाग म्हणून शांतीवन नेरे येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील बुजुर्गांचे आशीर्वाद घेत या ३६ वर्षांपूर्वीच्या मित्र मैत्रिणींनी दिवस सत्कारणी लावला. त्यामध्ये प्रसिद्ध गायक देवेंद्र पाटील , राजेंद्र ठाकूर , युवराज पाटील आणि संदीप कोळी विकास म्हात्रे यांनी विविध भावगीते आणि भक्तीगीते आपल्या सुमधुर आवाजात करा ओकेच्या संगीताच्या तालावर गात वातावरण अक्षरशः भारावून टाकले . या अतिशय उत्तम संगीत मैफलीचे त्या वृद्धांनी देखील कौतुक करून आपली आवडीची गाणी देखील या गायकांना बोलायला लावत चांगलीच दाद दिली. हा कार्यक्रम १९८९ च्या दहावी बॅचचे कृष्णा पाटील , समता पाटील ,देवेंद्र पाटील , कांचन थळी , शोभा पाटील, विद्याधर पाटील , विश्वनाथ म्हात्रे , श्यामकांत पाटील , सुरेश म्हात्रे , दिनेश म्हात्रे , मेजर संतोष गावंड , लक्ष्मीकांत म्हात्रे , डी.बी. गावंड , प्रदीप पाटील , सुनील आणि अजित पाटील यांच्यासह दहावी बँच १९८९ च्या मित्र मैत्रीणींच्या गृपच्या वतीने करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या वृद्धाश्रमाचे चेअरमन प्रसिद्ध वकील प्रमोद ठाकूर हे अचानक त्या ठिकाणी आले होते त्यांनी देखील या कार्यक्रमाचे कौतुक करून आपणासारख्या तरुणाईची आमच्या या वृद्धाश्रमाच्या पुढील वाटचालीत खऱ्या अर्थाने गरज असून आपण सर्वानी या कार्यात हातभार लावावा असे आवाहन यावेळी केले . तर वावंजे गावचे सरपंच डी . बी . म्हात्रे यांनी देखील या कार्यक्रमात आपला सहभाग दर्शवत कार्यक्रमाचे आणि आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमात यावर्षी उत्कृष्ट शिक्षिका म्हणून अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या नावाने पुरस्कार मिळालेल्या शिक्षिका समता संजीव पाटील या शिक्षिकेचा खास सत्कार आश्रमातील बुजूर्गांच्या हस्ते करण्यात आला.