एमआयडीसीतील विकास कामांचा डिपीआर तयार करावा – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना/प्रतिनिधी,दि.25
जालना शहरातील एमआयडीसी परिसराचा (औद्योगिक वसाहत) सर्वांगिण विकासाकरीता डिपीआर तयार करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक, सौ.सुषमा नगरदेवळेकर, सहाय्यक अभियंता मस्तान शहा, प्रमुख भूमापक रमेश डोईफोडे आणि उद्योजकांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जालना येथील औद्यागिक वसाहतीमध्ये अनेक मोठ्या औद्योगिक संस्था कार्यरत आहेत. परंतू याठिकाणी आवश्यक रस्ते, पार्किंग, सुरळीत वीज पुरवठा आदी सुविधा नाहीत. याकरीता औद्योगिक वसाहतीत विविध विकास कामे व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीने लवकरात लवकर डीपीआर तयार करावा. एमआयडीसीच्या 4 थ्या फेजकरीता जागा पाहून प्रस्ताव सादर करावा. लवकरच याबाबत उद्योग विभागात बैठक लावून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.
यावेळी उद्योजकांच्या संघटनेने औद्यागिक वसाहतीतील रस्ते, स्ट्रीट लाईट, ट्रक पार्कींग, ड्रेनेज व्यवस्था, जुना बायपास रस्ता, सीटी बस सुरु करणे, मल्टीपार्क बाबत, बायपासच्या टप्पा-3 जवळ उड्डानपुल आदी मागण्या सादर केल्या.



