जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचे आय.एम.ए. ला आवाहन
खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी सर्व फुप्फुस क्षयरुग्णांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार घेण्यास प्रवृत्त करावे

जालना/प्रतिनिधी,दि.9
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत अजा दि. 9 जून 2023 रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टिबी फोरम व टिबी कॉ- मोरबिडीटी कमीटीची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली. यावेळीट जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड बोलत होते. भारत सरकारने 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे क्षयरोग आजार हा नोटीफायबल आजार म्हणुन घोषित करण्यात आलेला आहे. खाजगी रुग्णालयात क्षयरोगावरील उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची 100 टक्के नोंद घेऊन त्यांना निक्क्षम पोषण योजनेचा (डिबीटी) लाभ देण्याबाबत सुचना दिल्या व सर्व क्षयरुग्णांची राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते क्रमांक निक्क्षयमध्ये अद्यावत करावेत जेणे करुन त्यांना सदर लाभ मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामपंचायतीमध्ये टिबीमुक्त पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायतस्तरावर क्षयरोगाबाबत प्रसिध्दी करण्याच्या सुचना दिल्या. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांना भारत सन 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्यासाठी क्षयरोगाचे काम वाढविण्याबाबत सुचना दिल्या.
तसेच सर्व फुप्फुस क्षयरुणांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार म्हणजेच पीएम- टिपीटी म्हणजे सहा महिन्यासाठी सहवासितांच्या वजनानुसार आय.एन.एच. औषधी देण्याकरीता नातेवाईकांना प्रवृत्त करावे जेणे करुन त्यांना क्षयरोग होण्यापासुन त्यांचा बचाव होईल यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना आवाहन केले व ते वाढविण्यासाठी आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. माधव आंबेकर यांनी पुढाकार घ्यावा असे सुचविले.
यावेळी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अधिकारी वर्षा मिना,जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. पी.ए. नागदरवाड, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसार, डॉ. मुळे, डॉ. बादल, सामान्य रुग्णालय, आयएमए अध्यक्ष डॉ. माधव आंबेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप, मुख्य अधिकारी नगर परिषद संतोष खांडेकर, डॉ. संदिप गोरे, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. मनिष शहाणी, डॉ. अहिर शहा, राजेश गायकवाड तसेच आरोग्य अधिकारी घनसावंगी, अंबड, जाफ्राबाद यांच्यासह जिल्हास्तरावरील एनटिईपी कर्मचारी यांची उपस्थिती होती.