श्री क्षेत्र संगमेश्वर उरण देऊळवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात संपन्न.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
हिंदू धर्मातील पवित्र सणापैकी महाशिवरात्री हा पवित्र सण मानला जात असून या दिवशी भगवान शिवाची मोठ्या प्रमाणात सर्वत्र पूजा,अर्चा, आराधना केली जाते. उरण शहरातील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देऊळवाडी येथील श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान (श्री शंकर मंदिर) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे २ ते ४ या वेळेत शिवभक्त गोवारी कुटुंब यांच्या हस्ते महारुद्र अभिषेक, सकाळी १० वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ बोकडविरा यांचे भजन, सकाळी ११ वाजता श्री साईबाबा मंदिर चार फाटा उरण येथून येणाऱ्या सर्व साई भक्तांचे स्वागत, दुपारी ३ वाजता वारकरी संप्रदाय मंडळ पंचक्रोशी उरण यांचे कीर्तन त्यानंतर इंचगिरी सांप्रदाय गुरुभक्त वारकरी मंडळ उरण परिसर यांचे कीर्तन संपन्न झाले. या कीर्तनात ह भ प राजेंद्र गुरुजी महाराज यांनी शिव भक्तांना, भाविक भक्तांना शिव भक्तीचे,कर्माचे महत्त्व सांगितले व उत्तम मार्गदर्शन केले. उरण तालुक्यातील व तालुक्या बाहेरील भावीक भक्तांनी रांगेत उभे राहून शिस्तीने देव दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी उपवासाचे नाश्त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोटनाका रेल्वे प्रकल्पग्रस्त संघटनेचे सचिव,सिडको प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते, व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते हेमदास वामन गोवारी यांनी सभा मंडप,साऊंड सिस्टिम, व विद्युत रोषणाई आदीची उत्तम व्यवस्था केली होती. गोवारी कुटुंबीय गेली ६५ वर्षापासून ही सेवा अखंडितपणे करीत आहेत. दरवर्षी पूजेचा मान गोवारी कुटुंबाला मिळत असतो. यावेळी सुभाष गोवारी, देविदास गोवारी, जमनादास गोवारी व गोवारी कुटुंबीयांनी कार्यक्रम चांगले व यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.ओम गोवारी,ग्लाव्हेर गोवारी,हर्षल गोवारी, राज गोवारी, होमीपती गोवारी,प्रेम गोवारी ही नवी पिढीही यावेळी सक्रिय झाली होती. गोवारी कुटुंबातील नव्या पिढीनेही यात सक्रिय सहभाग नोंदविला.


