राज्यातील पहिल्या वस्तीगृहाचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने राज्यात 72 वस्तीगृहांची करण्यात येणार उभारणी

जालना/प्रतिनिधी,दि. 15
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने राज्यात 72 वस्तीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पहिल्या वस्तीगृहाचे जालना येथे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील मुला-मुलींची शहरात शिक्षण घेत असताना राहण्याची अडचण निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारच्या वतीने राज्यातील 36 जिल्ह्यात प्रत्येकी 2 वस्तीगृह तयार करण्यात येत आहे. यात 100 मुले आणि 100 मुली यांना राहण्यासाठी या वसतिगृहाचे उपयोग होणार आहे. स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून गुरुवारी जालना येथे पहिल्या वस्तीगृहाचे उद्घाटन पार पडले. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुला मुलींची निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याने यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये याचा निश्चितच खूप मोठा उपयोग होईल, असे प्रतिपादन यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी केले.
पुढे बोलतांना मंत्री अतुल सावे म्हणाले की, वस्तीगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, विविध भत्ते, ग्रंथालय अशा विविध सुविधा पुरवण्यात येणार आहे. अशा या सर्व सुविधा युक्त असलेल्या या वस्तीगृहात जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा तसेच ज्यांना प्रवेश मिळणार नाही अशांना सावित्रीबाई फुले आधार योजना आणि स्वयंम योजनेच्या माध्यमातून प्रवेश देण्यासाठी विभागाच्यावतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.