जालना तालुक्यातील मौजपुरी येथील जिल्हा परिषद शाळेची मोडकळीस आलेली जिर्ण इमारत पाडून तात्काळ नवीन इमारत बांधण्याच्या मागणीसह जलजीवन मिशन योजनेचे काम हे 15 ऑगस्टपूर्वी सुरु करावे अन्यथा 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर केशवपन करुन मुंडन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अच्युत मोरे यांनी दिलाय. या संदर्भात अच्युत मोरे यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी स्वरुपात पत्र दिलं आहे.
मौजपुरी येथील शाळेत गावातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. शाळेच्या सर्व इमारती या अत्यंत जिर्ण झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक इमारतीच्या छताळा गळती लागली असून कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिर्ण झालेल्या इमारती पाडून नव्याने इमारत बांधण्यात यावी. अशी मागणी पत्राद्वारे केलीय. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा ही 7 व्या वर्गापर्यंत आहे. या शाळेत गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्यात यावे व 7 व्या वर्गापर्यंत असलेल्या शाळेला 8 वा वर्ग जोडण्यात यावा, शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्नींग सुविधा उपलब्ध करुन शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. मौजपुरी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून या गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दुषीत पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या गावात शासनाने मंजुर केलेल्या जल जिवन मिशन च्या कामाला 15 ऑगस्ट पुर्वीच सुरुवात करुन दिलासा द्यावा. मौजपुरी ते मानेगाव रोड पर्यंत रस्त्याचे काम करुन डांबरीकरण करण्यात यावे. मौजपुरी ते निरखेडा रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून पुर्ण करण्यात यावे. मौजपुरी ते रामनगर-मंठा रोड पर्यंत रोजगार हमी योजनेतून काम पुर्ण करावे. आदी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत. सदरील मागण्या संदर्भात तात्काळ योग्य ती कारवाई करुन लेखी स्वरुपात कळवावे अन्यथा दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषदे च्या समोर मुंडन(केशवपन) आंदोलन करुन जिल्हा परिषदेच्या गेटवर केसार्पन करण्यात येतील. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अच्युत मोरे यांनी दिलाय.
————