सोनारी येथील रामचंद्र कडू यांच्या घराला उच्च न्यायालया कडून दिलासा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील घरांचा विषय ऐरणीवर आला असताना, सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी रामचंद्र पोशा कडू यांच्या घरा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात त्यांचे वकील अँड प्रियांका सुरेश ठाकूर यांचे मार्फत सिव्हिल रिट पिटीशन क्रं २६६१/२०२४ दाखल करण्यात आले असता मा. उच्च न्यायालयाने कोकण कमिशनर रायगड जिल्हाधिकारी यास उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील रामचंद्र पोशा कडू यांच्या घर क्रं २८०/अ /ब या घरावर तोडक कारवाई करण्यास मनाई केली आहे.एकंदरीत कडू यांना मा.उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणी थोडक्यात हकिकत अशी की जेएनपीएने २२ वर्षांपूर्वी सार्वजनिक उपयोगासाठी सुमारे ३३ हेक्टर क्षेत्र प्रकल्पबाधित सोनारी,करळ , सावरखार, जसखार आदी चार गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले आहे .त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जमिनी चारही ग्रामपंचायतींच्या नावे केल्या आहेत.मात्र ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनी स्थानिक ग्रामस्थ मंडळाने फरोक्त खताने गावकऱ्यांना विकल्या आहेत.या जमिनीवर नागरिकांनी घरे बांधली आहेत. अशाच बांधलेल्या घरांवरुन सोनारी येथील रहिवासी उर्मिला आशिर्वाद म्हात्रे आणि रामचंद्र पोशा कडू यांच्यात वाद निर्माण झाला होता.उर्मिला म्हात्रे यांनी मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका क्रं ९३२३/२०२२ दाखल केली होती.उच्च न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेल प्रांत अधिकाऱ्यांना दिले होते.पनवेल प्रांत.अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी सुनावणी घेऊन अर्जदार सौ.उर्मिला म्हात्रे यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार केली होती ते रामचंद्र कडू या दोघांची ही बांधकामे बेकायदेशीर आहेत.त्यामुळे ती बांधकामे एक महिन्याच्या आत तोडावीत असे आदेश गटविकास अधिकारी उरण पंचायत समिती यांस दिले.तसेच अधिकार नसताना जागेची विक्री केली म्हणून सोनारी ग्रामसुधारणा कार्यकारी मंडळातील सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यामुळे एकच परिसरात खळबळ माजली.
या संदर्भात रामचंद्र पोशा कडू यांनी कोकण कमिशनर व रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपिल दाखल करण्यास गेले असता कडू यांचे सदर प्रकरणी अपिल दोन्ही कार्यालयानी करुन घेतले नाही.त्यामुळे रामचंद्र पोशा कडू यांनी त्यांचे वकील अँड प्रियांका सुरेश ठाकूर यांच्या मार्फत मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे रिट पिटीशन दाखल केली.यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या डिव्हीजन बेंचने कडू यांची रिट याचिका मान्य केली.सदर रिट याचिकेवर उच्च न्यायालयाचे डिव्हिजनल बेंच पुढे सुनावणीस आली असता मा.न्यायमुर्ती श्री जी एस कुलकर्णी व मा.न्यायमुर्ती श्री.फिरदोश पुनीवाल्ला यांच्या डिविजनल बेंचने तोडक कारवाईस मनाई करण्याचा आदेश देऊन अर्जदार रामचंद्र पोशा कडू,रोशन कडू यांस कोकण कमिशनर यांच्याकडे दोन आठवड्यात अर्ज दाखल करावा व कोकण कमिशनरने त्यावर सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत.याप्रकरणी अर्जदारांची बाजू अँड प्रियांका सुरेश ठाकूर यांनी प्रभावीपणे मांडली.
एकंदरीत उरण तालुक्यातील सोनारी प्रमाणे गावातील ग्रामसुधारण मंडळांनी जसखार, करळ ,सावरखार गावातील ग्रामस्थांना जमिनीचे वाटप केले असून सदर जागेवर ग्रामस्थांनी अनेक घरे बांधली आहेत.त्या बांधकामांचे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.