कृषी महोत्सवास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट
शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन पुरस्कार प्राप्त शेतकरी व प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 5 मार्चपर्यंत सुरु राहणार कृषी महोत्सव

जालना/प्रतिनिधी,दि. 2
जालना शहरात आयोजित “गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवास” आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.
प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांच्यावतीने पाच दिवसीय गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे कलश सिडस मैदान, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे. आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री. दानवे यांनी कृषी महोत्सवास भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी करून स्टॉलधारक व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. दानवे म्हणाले की, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. काळानुरूप शेती पद्धतीत आमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन शेती समृद्ध करावी. शिकलेल्या व्यक्तींनीसुद्धा शेतीकडे वळावे, जेणेकरूण शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अवघ्या एक रुपयात शेतकऱ्यांना पिकविमा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनांचा निश्चितपणे लाभ घ्यावा.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी व प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुरस्कार प्राप्त शेतकरी-वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त श्रीकृष्ण नामदेव डोंगरे रा. बाजी उम्रद, ता. जालना, वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त पांडुरंग निवृत्ती डोंगरे, रा. कर्जत, ता. अंबड, उदयसिंग सुखलाल चुंगडे, रा. ठालेवाडी , ता. भोकरदन, रामदास शेषेराव बारगाजे, रा.भराडखेडा, ता. बदनापुर, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सुचिता दत्तात्रय शिनगारे
खेडगाव, ता. अंबड, उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त रामेश्वर भगवान उबाळे, नंदापुर, ता. जालना यांच्यासह रेशीम शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच आणि जिल्ह्यातील 40 प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.मानव विकास मिशन योजनेतून 3 ड्रोनचे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पमधून 14 आयशरचे वितरण करण्यात आले.