राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.18
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती शिष्यवृती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात QS World University Ranking 200 च्या आत रँकींग असलेल्या विद्यापीठात पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका व पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्याकडून दि. 12 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच जाहिरातही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या योजनेचा तपशील, अर्जाचा नमुना व इतर आवश्यक माहिती www.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.