pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 21

जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार असून याकरीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. सदर स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे.या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने जालना जिल्हयातील युवक-युवतींनी विविध ५२ क्षेत्रामध्ये होणा-या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी https://kaushalya.mahaswayam.gov.in या महास्वयंम वेबपोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.
यापुर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधुन 50 देशातील 10000 उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवडयासाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रांन्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००२ किंवा तद्नंतरचा असावा. तसेच, आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन & वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकीता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हा, विभाग, राज्य, आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम/हॉस्पिटेलिटी इंस्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीकडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेच, या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल. यासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी www.kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2