महाराष्ट्र

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खतांचा पुरवठा,बियाणांचा काळाबाजार होणार नाही, जिल्ह्यात कृषी उत्पादक कंपन्यांची स्थापना करा, पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण करा,करा शेतकऱ्यांना बांधावर खत वाटपाचे योग्य नियोजन, प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट सुरू करणार.- पालकमंत्री राजेश टोपे

जालना/प्रतिनिधी:दि 3

खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणांचा पुरवठा व्हावा. खते व बियाण्यांची टंचाई भासणार नाही तसेच बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. आज दि 3 मे रोजी खरीप हंगाम आढावा बैठकीचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे,आमदार कैलास गोरंट्याल,आमदार नारायण कुचे,आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे ,कृषिविकास अधिकारी जि.प. श्री.रणदिवे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री.देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे श्री.ईलमकर आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे तसेच खतांचे वाटप होईल, या दृष्टीने कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करण्याबरोबरच बियाणांचा व खतांचा काळाबाजार होणार नाही तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बियाण्यांची बाजारात विक्री न करता त्याच बियाणांचा पेरणीसाठी अधिक प्रमाणात वापर करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी या वेळी केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करत असताना नवनवीन प्रयोग करून शेतीची उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात अधिकाधिक कृषी उत्पादक कंपन्यांची स्थापना होण्याची गरज असून यासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. कृषी उत्पादक कंपनी स्थापन करून पिकवलेल्या मालाचे ब्रँडिंग करून माल आकर्षक पद्धतीने पॅक करून विक्री केल्यास त्या मालाला बाजारात अधिक चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावून त्यांच्या आर्थिक उत्पप्नात भर पडण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. यासाठी जिल्ह्याला देण्यात आलेले पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट 100 टकके पूर्ण होण्यासाठी प्रत्येक बँकांना देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात यावे. कर्ज वाटपाच्या बाबतीत कुठलीही सबब ऐकून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने या वाटपाचा आढावा घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी-अडचणीची वेळेत सोडवणूक होण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षपणे काम करावे. शेतकऱ्यांना बांधावर खते वाटप होण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याबरोबरच फळबाग लागवडीपासून अधिक चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच कृषी पंपाच्या जोडणीचे उद्दिष्ट विद्युत विभागाने वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून बाधित व्यक्तींना चांगल्या प्रमाणात उपचार मिळावेत यासाठी आरोग्याच्या सेवा अधिक प्रमाणात वाढविण्यावर भर देण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट सुरू करण्यात येत आहे. आमदार निधीतून 1 कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली असल्याने प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी या माध्यमातून आवश्यक ती साधन सामुग्री खरेदी करावी. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेले औषधी, कोविड सेंटर, मनुष्यबळ आदी बाबी मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत असून तालुक्यात याबाबत काही अडचणी असतील तर त्या कळवाव्यात त्याची त्वरेने पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

या ऑनलाइन बैठकीमध्ये सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधीही खरीप हंगामाच्या अनुषंगाने मौलिक सूचना मांडल्या.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .