शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी
जालना शहरातील विविध भागात केली पाहणी

जालना/प्रतिनिधी,दि.17
जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गाव परिसरात शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे उभी पिके जमिनदोस्त झाली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी जनार्धन मात्रे यांच्याशी संवाद साधत झालेल्या पिक नुकसानीची माहिती जाणून घेतली. शासन नुकसानग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून काळजी करु नका अशा शब्दांत बाधित शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी तुर, कापुस व सोयाबीन या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिवृष्टीने बाधित पिकाने अतोनात नुकसान झाले असून शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे मत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी आमदार नारायण कुचे, भाऊसाहेब घुगे, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, नायब तहसीलदार श्री. राजमाने यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



