दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

जालना/प्रतिनिधी,दि.9
महाराष्ट्रात आज एकाच वेळी 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात होत आहे. केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करणे हा याचा हेतू नसून, महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या जीवनात आनंद कायम ठेवून त्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा हा महायज्ञ असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उदघाटनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात दुरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आरोग्य व कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तर आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जूनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांची यावेळी प्रत्यक्ष उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच वेळी जालना, हिंगोली, बुलढाणा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, अमरावती, मुंबई, नाशिक आणि अंबरनाथ (ठाणे) या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात होत आहे. यामुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे आता सुमारे 900 विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या इच्छांना उभारी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील लाखो परिवारांना आरोग्याच्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. मागील 10 वर्षात महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विकास झाला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरात मेट्रोचा विस्तार केला गेला आहे. रस्ते व विमानतळे आंतरराष्ट्रीय दर्जाची विकसित करण्यात आली. वेळोवेळी शेतकरी व पशुपालकांना मदत करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय शिक्षण देखील मराठी भाषेत मिळणार आहे. युवकांना उच्च शिक्षणांच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे ही पंतप्रधान यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. एकनाध शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सर्व बाबतीत नेहमीच आघाडीवर राहणारे राज्य आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून महाराष्ट्रात एकाच वेळी 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात होण्याचा विक्रम आज घडत आहे. देशातील सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये ही महाराष्ट्र राज्यात स्थित आहेत. केंद्राच्या धोरणामुळे हे सर्व शक्य झाल्याचे सुतोवाचही त्यांनी काढले.
उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच वेळी 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन होत असल्याचा आनंद आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण असुन आरोग्य शिक्षण सुविधेसाठी आजचा दिवस मोलाचा आहे. नागपूरसह आज शिर्डीचे विमानतळ सक्षम होत आहे. शासनाकडून नेहमीच नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. नागपूर येथील मिहान प्रकल्पामुळे विविध रोजगारांच्या संधी मिळत आहे. मध्यभारतात नवीन विमानतळ, कार्गो हबमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, नागरिकांची उपस्थिती होती.